राष्ट्रपतींचे ट्विट हटवल्याने ‘या’ देशात ट्विटरवर बंदी, भारतासोबतही ट्विटरचा वाद सुरू

ट्विटर

नवी दिल्ली : एकीकडे ट्विटर भारतासह जगभरातील नेत्यांच्या अकाउंटवर कारवाई करत आहे, तर दुसरीकडे काही देशदेखील या मायक्रो ब्लॉगिंग सोशल नेटवर्किंग साईटवर बडगा उगारत आहे. नायजेरियाने ट्विटवर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या नियमनावरून आणि उपराष्ट्रपतींच्या ट्विटर अकाउंटवरील ब्लू टीक हटवल्यावरून भारत सरकारसोबतही ट्विटरचा वाद सुरू आहे.

अलीकडेच ट्विटरने नायजेरियाचे राष्ट्रपती मुहम्मद बुहारी यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून करण्यात आलेले ट्विट डिलीट केले होते. बुहारी यांनी आपल्या ट्विटमध्ये १९६७ ते ७० सालच्या गृहसंघर्षाचा उल्लेख करत प्रादेशिक फुटीरतावाद्यांवर कारवाईचा इशारा दिला होता.

पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या फुटीरतावाद्यांवर गृहसंघर्षावेळी ज्याप्रमाणे कारवाई झाली होती, तशी कारवाई करण्याची गरज असल्याचे बुहारी म्हणाले होते. १ जून रोजीचे हे ट्विट होते. ट्विटरने काही वेळातच हे ट्विट डिलीट केले.

राष्ट्रपतींच्या ट्विटमधील भाषा प्रक्षोभक, सामाजिक तेढ निर्माण करणारी आहे. हे आमच्या नियमांविरुद्ध असल्याने त्यांचे ट्विट डिलीट करण्यात येत असल्याचे कारण कंपनीने दिले. मात्र, ट्विटरच्या या कारवाईमुळे नायजेरिया सरकार चांगलेच संतापले. त्यामुळे सरकारकडून नायजेरियातील ट्विटरची सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

या कारवाईबाबत ट्विटरकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. नायजेरिया सरकारने घातलेल्या बंदीबाबत माहिती घेण्यात येत असून, त्यानंतरच भूमिका मांडण्यात येईल, असे ट्विटरकडून सांगण्यात आले आहे. या अमेरिकन सोशल मीडिया कंपनीने गेल्याच महिन्यात आपले आफ्रिकेतील मुख्यालय नायजेरियाच्या शेजारच्या घाना देशामध्ये हलवले आहे. अलीकडेच नायजेरियाचे माहिती-तंत्रज्ञानमंत्री लाई मुहम्मद यांनी ट्विटर पाश्चिमात्य देश आणि उर्वरित जगाबद्दल दुहेरी मापदंड लागू करत असल्याची टीका केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

IMP