तटकरेंनी घेतली नारायण राणेंची भेट

narayan-rane

मुंबई – विधान परिषद निवडणुकीत स्वाभिमानी संघटनेची मते निर्णायक ठरणार आहेत. दरम्यान कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी नारायण राणे यांची भेट घेतल्याने तर्क – वितर्कांना उधाण आले आहे. एका विवाह समारंभासाठी नारायण राणे रोहा तालुक्यातील पारंगखार येथे आले होते. यावेळी दोघात वीस मिनिटे चर्चा झाली.

विधान परिषद कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेच्या राजीव साबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिकेत तटकरे यांच्या थेट लढत होणार आहे. २१ मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीला शेकाप, मनसे आणि काँग्रेसची, तर शिवसेनेला भाजपची मदत होणार आहे. मात्र पक्षीय बलाबल लक्षात घेतले तर नारायण राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेची मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

तर दुसरीकडे सुनील तटकरे यांनी ज्येष्ठ नेत्यांना डावलून विधानपरिषदेसाठी आपल्या मुलाला अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचं पाहायला मिळत आहे.