सृजनरंगाच्या उन्मेशासाठी लोकमंगल महाविद्यालय सज्ज, युवा महोत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा सोळावा युवा महोत्सव श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठानच्या वडाळा येथील लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालय येथे होणार आहे. गुरुवार, 19 ते 22 सप्टेंबर 2019 दरम्यान रंगणाऱ्या या युवा महोत्सवासाठी लोकमंगल नगरी नववधूसारखी नटली आहे. हिरव्यागार वनश्रीचा शालू नेसलेला लोकमंगल शिक्षण संकुलाचा परिसर सृजनरंगाच्या उन्मेशासाठी सज्ज झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस आणि लोकमंगलच्या सचिवा अनिता ढोबळे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा सोळावा युवा महोत्सव उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील लोकमंगल महाविद्यालयात होत आहे. लोकमंगल महाविद्यालयात यापूर्वी दोनदा युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी पुन्हा एकदा युवा महोत्सवाचे यजमानपद लोकमंगलने स्वीकारले आहे. संस्थेचे अध्यक्ष रोहन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा युवा महोत्सव होत असल्याचे ढोबळे यांनी यावेळी सांगितले.

या युवा महोत्सवात वक्तृत्व स्पर्धा, मूकनाट्य, समूहगीत, कातरकाम, प्रश्नमंजुषा, व्यक्तिचित्र, एकांकिका, पथनाट्य, सुगम गायन, स्थळ चित्रण, शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय सुरवाद्य, वाद-विवाद, रांगोळी, नकला, लोकनृत्य, शास्त्रीय गायन, तालवाद्य, निर्मिती चित्र, फोकआर्केस्ट्रा, फोटोग्राफी, लघुनाटिका, मातीकाम आणि शोभायात्रा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या युवा महोत्सवाचे उद्घाटन गुरुवार, 19 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता सायबर मुंबईचे पोलीस अधीक्षक डॉ. बालसिंग राजपूत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी लागीर झालं जी फेम राहुल मगदूम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. फडवणीस या राहतील. स्वागताध्यक्ष म्हणून रोहन देशमुख यांची उपस्थिती असेल. समारोप व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम रविवार, 22 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता सिनेअभिनेता योगेश शिरसट यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संभाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहील.

युवा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून मुक्ताजंली हा मुख्य रंगमंच 45 बाय 35 फुटाचा आहे. 60 फूट बाय 140 फुटाचा सभामंडप असून सुमारे पंधराशे प्रेक्षक बसण्याची व्यवस्था येथे आहे. पावसाची दक्षता पाहून 8400 चौरस फुटाचा पत्राशेड सभामंडप उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर स्वरांजली, रंगावली व शब्दांजली असे इतर तीन रंगमंचावर कला प्रकारांचे सादरीकरण होईल, असे ढोबळे यांनी सांगितले.