‘हा’ मातब्बर नेता युती – आघाडीत नजाता स्वतःच्या हिंमतीवर विधानसभा गाजवणार

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी भाजप – सेनेत प्रवेश करत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कधीकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असलेले शंकरराव गडाख यांनी भाजप – सेनेत न जाता अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे खुद्द शंकरराव गडाख यांनी कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले आहे.

शंकरराव गडाख हे भाजप – सेनेत जाणार असल्याची चर्चा होती. मात्र शंकरराव गडाख यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातूनचं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोनई येथे हजारो कार्यकर्त्यांच्या झालेल्या या मेळाव्यात आपण कोणत्याही पक्षात जाणार नसून क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा शंकरराव गडाख यांनी केली आहे.

दरम्यान गेल्या निवडणुकीत शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळावर निवडणूक लढवली होती. मात्र, केवळ चार हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणामुळे आपण पराभूत झाल्याची गडाखांची धारणा झाल्याने त्यांनी अडीच वर्षापूर्वी राष्ट्रवादीतून बाहेर पडत क्रांतिकारी शेतकरी पक्ष स्थापन केली. त्यामुळे या विधानसभेला गडाख हे अपक्ष लढणार आहेत. हे चित्र स्पष्ट झाल्याने आता कार्यकर्ते ही कामाला लागले आहेत.