अतिदुर्गम माळवाडी, धानवली गावांच्या विद्युतीकरणाचे आव्हान पुर्णत्वाकडे

बारामती : ऐतिहासिक रायरेश्वर पठारावर अन्‌ समुद्रसपाटीपासून सुमारे 4750 फूट उंचीवर वसलेल्या माळवाडी व धानवली (ता. भोर, जि. पुणे) या गावांना वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून उभारण्यात येणाऱ्या वीजयंत्रणेचे काम पूर्णत्वाकडे आहे. या गावांमध्ये सुमारे 100 वीजखांब व एक रोहित्र उभारण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच या गावांचा वीजपुरवठा सुरु होणार आहे.

अतिदुर्गम व सह्याद्री डोंगररागांच्या कुशीत अन् घनदाट जंगल तसेच वाहतुकीची कोणतीही व्यवस्था नसलेल्या पुणे जिल्ह्यातील माळवाडी व धानवली गावांमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून विद्युतीकरणाचे काम सुरु आहे. डोंगरदऱ्या व कातळ कडा चढत वीजखांब व इतर विद्युत साहित्य अक्षरशः खांद्यावर वाहून नेत हे विद्युतीकरणाचे काम सुरु असल्याने नियोजित वेळेपेक्षा थोडा उशिर झाला आहे.

लोकसभा निवडणुकीत अतिदुर्गम रायरेश्वर पठारावरील मतदान केंद्रामुळे माळवाडी व धानवली गावे नुकतीच चर्चेत आली होती. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी या गावांच्या विद्युतीकरणासाठी उभारण्यात येत असलेल्या वीजयंत्रणेचा आढावा घेतला व ही दोन्ही गावे लवकरच प्रकाशमान होतील असा विश्वास व्यक्त केला.

भोरपासून सुमारे 40 किलोमीटरवर अंतरावर असलेल्या या दोन्ही गावांमध्ये जाण्यासाठी कोणतीही वाहतूक व्यवस्था नाही. खोल दऱ्या, दाट झाडी, उंच सुळके व आडवळणीचा घाट अशा अत्यंत दुर्गम व 11 किलोमीटर अखंड असलेल्या रायरेश्वर पठारावर रायरी ग्रामपंचायत अंतर्गत माळवाडी हे 10 घरांचे गाव वसलेले आहे. त्यापुढे अडीच किलोमीटरवर धानवली हे स्वतंत्र ग्रामपंचायतीचे 35 घरांचे गाव आहे. रायरेश्वर पठारावरील माळवाडी येथे जाण्यासाठी 300 फूट उंचीचा कातळ कडा लोखंडी शिडीच्या सहाय्याने चढावा लागतो तर तेथून धानवली गावात जाण्यासाठी 235 फुटाचा कातळ कडा उतरावा लागतो. अशा स्थितीत वीजखांबांसह इतर विद्युत साहित्य खांद्यावर वाहून नेण्यात येत आहे.

माळवाडी व धानवली गावांसाठी जिल्हा नियोजन विकास समितीने 35 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून रायरेश्वर मंदिरापासून 50 वीजखांबांद्वारे सुमारे 3.5 किलोमीटर उच्चदाब वीजवाहिनीचे काम सुरु आहे. माळवाडी येथे 63 केव्हीए क्षमतेचे रोहित्र बसविण्यात येत आहे. माळवाडी येथून पुढे आणखी 50 वीजखांब उभे करून दोन किलोमीटरवर असलेल्या धानवली या गावाला वीजपुरवठा करण्यात येणार आहे. या दोन्ही गावांच्या विद्युतीकरणसाठी 100 वीजखांब, एक रोहित्र, 21 किलोमीटर उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या व इतर साहित्य हे 11 किलोमीटरच्या पायरस्त्याने व डोंगरदऱ्यातून नेण्यात येत आहे.

बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनील पावडे हे या दोन्ही गावांच्या विद्युतीकरणाकडे विशेष लक्ष देत आहेत. प्रभारी अधीक्षक अभियंता श्री. केशव काळुमाळी, सासवड विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अरविंद वनमोरे यांच्यासह भोर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. सतीश चव्हाण, महावितरणचे कर्मचारी तसेच कंत्राटदार एम.आर.के इलेक्ट्रिकल्सचे कर्मचारी माळवाडी व धानवली गावांच्या विद्युतीकरणासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक व डोंगराळ परिस्थितीत सुरु असलेले विद्युतीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. रोहित्र व वीजखांब उभारण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. ही वीजयंत्रणा पूर्ण झाल्यानंतर माळवडी व धानवली येथील 45 घरांना नवीन वीजजोडणी उपलब्ध होणार आहे.Loading…
Loading...