fbpx

नेत्यांनी मर्जीतल्या लोकांना नियमबाह्यपणे कर्जवाटप करून बँक डबघाईला आणली

पुणे : राज्य सहकारी बँकेच्या 25 हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह 50 जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्चन्यायालयाने दिले आहेत. त्यामुळेच अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रावादी यांच्यातील राजकारणात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार चर्चेत आला होता.

सुमारे २५ हजार कोटी रुपयांच्या या कर्जवाटप घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह सत्तर मोठ्या नेत्यांचा सहभाग असल्याचं, याबाबतच्या याचिकेत नमूद आहे. या सर्वाविरोधात प्रथमदर्शनी सबळ पुरावे असल्यानं, गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. बँकेच्या संचालक मंडळात राहिलेल्या राजकीय नेत्यांनी आपले निकटवर्तीय तसंच मर्जीतल्या लोकांना नियमबाह्यपणे कर्जवाटप केल्यामुळे बँक डबघाईला आल्याचं निष्पन्न झालं, त्यामुळे याप्रकरणी तत्कालीन संचालक तसंच अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून चौकशी करावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली.

बँकेच्या अध्यक्षपदी माणिकराव पाटील होते, तर संचालकांमध्ये अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे, हसन मुश्रीफ यांच्यासारखे बडे नेते. वर्चस्व काँग्रेस-राष्ट्रवादीचं असलं, तरी सर्वपक्षीय नेतेमंडळी या संचालक मंडळात होती. त्यापैकीच ७० जणांवर पाच दिवसांत गुन्हे दाखल करण्याचा आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.