कोपर्डी प्रकरणाचा निकाल १८ नोव्हेंबरला जाहीर होणार

अहमदनगर : नगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार व खून प्रकरणी सरकार पक्ष व आरोपींच्या वकीलांचा अंतिम युक्तीवाद पूर्ण झाला आहे. कोपर्डी प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्याने न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल १८ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

अंतिम युक्तीवाद करतांना आरोपीच्या वकीलांनी तीनही आरोपी निर्दोष होण्याचा दावा केला आहे. मात्र विशेष सरकारी वकील अॅड.उज्ज्वल निकम यांनी तीनही आरोपी दोषी असल्याचा युक्तीवाद करून तिघांनीही फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. अहमदनगर च्या जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयात कोपर्डी प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

सुनावणी दरम्यान विशेष सरकारी वकील अॅड.निकम यांनी प्रभावी पध्दतीने युक्तीवाद करीत तीनही आरोपींनी कट करून मुलीवर अत्याचार करून अतिशय निर्घृणपणे तिची हत्या केल्याचा युक्तीवाद केला.आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदेच्या वतीने अॅड.योहान मकासरे,आरोपी संतोष भवाळच्या वतीने अॅड.बाळासाहेब खोपडे,अॅड.विजयालक्ष्मी खोपडे व तिसरा आरोपी नितीन भैलुमे च्या वतीने अॅड.प्रकाश आहेर यांनी युक्तीवाद केला.

सुनावणी दरम्यान या प्रकरणात एकूण ३१ साक्षीदार तपासण्यात आले.अंतिम युक्तीवाद करताना आरोपींच्या वकीलांनी सरकार पक्षाने सादर केलेले पुरावे खोटे असून आरोपी निर्दोष असण्याचा दावा केला आहे. न्यायालयाने आरोपींच्या वकीलांना लेखी स्वरूपात अंतिम युक्तीवाद सादर करण्याचा आदेश देऊन १८ नोव्हेंबर रोजी कोपर्डी प्रकरणाचा निकाल जाहीर करण्याची माहिती दिली आहे.