पिककर्ज वाटप तात्काळ सुरु करण्याची मागणी पकडू लागली जोर

farmer

करमाळा : खरिप हंगामासाठी व कर्ज माफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यासांठी तात्काळ पिक कर्ज देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी शिवसेना माजी तालुका प्रमुख शाहुराव फरतडे यांनी कृषी मंत्री, सहकार मंत्री, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

सध्या कोरोनामुळे सर्वच उद्योग व्यवसाय अडचणीत आले आहेत. शेती व्यवसायावर देखील संकट कोसळले असून शेतकरी अर्थीक संकटात सापडला आहे. कमी वेळेत पैसे देणारी फळ भाजीची पिके घेणारा शेतकरी असो किंवा द्राक्ष, केळी उत्पादक शेतकरी असो कोरोनाच्या नावा खाली व्यापारी व दलाल यांनी शेतकरी पिळवटून काढला आहे. त्यामुळे शेतीचे बजेट कोसळले आहे.

कोरोनाचे संकट घोंगावत असतानाच खरिप हंगाम तोंडावर आला आहे. खरिपासाठी शेतीची मशागत सुरु असून बियाणे, खते यासाठी शेतकऱ्याकडे पैशाची चणचण आहे. तसेच कर्जमाफी योजनेत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना देखील नविन पिककर्ज मिळाले नाही. सध्या बँकेत पैसे भरणे व काढणे एवढेच व्यवहार सुरु असून जुलैपर्यंत पिककर्ज न देण्याचा जिल्हाधिकारी यांचा आदेश असल्याचे बँकेचे कर्मचारी सांगत आहेत .

जिल्हधिकारी यांच्या आदेशामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने खाजगी सावकारांंचा आधार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने दिलेेल्या कर्जमाफीनंतर सुद्धा शेतकरी खासगी सावकारकीला बळी पडण्याचा धोका आहे. तरी शेतकऱ्याच्या महत्वपूर्ण मागणीचा विचार करुन सरकारने खरिप हंगामासाठी व कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या सूचना कराव्यात, अशी मागणी शिवसेना माजी तालुका प्रमुख शाहुराव फरतडे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

’20 लाख कोटी रुपयांच्या जाहीर केलेल्या महापॅकेजचे जनता स्वागत करीत आहे ‘

उदगीर : कोरोनाबाधित रुग्णांची तब्येत चांगले असल्याने 19 मे पर्यंत सर्वांना घरी सोडण्यात येणार