चारा-छावणी घोटाळाप्रकरणी 176 संस्थांविरूध्द गुन्हे दाखल

अहमदनगर : नगर जिल्ह्यात 2012-13 व 2013-14 या 2 वर्षांच्या कालावधीत भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यानंतर मोठ्या संख्येने जनावरांसाठी चारा डेपो व छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या.मात्र या छावण्या व चारा डेपोंच्या कामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याच्या संदर्भात एकूण 426 संस्थांच्या विरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सुमारे 176 संस्थांच्या विरोधात पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चारा डेपो व जनावरांच्या छावण्यांमध्ये घोटाळे करणार्या संबंधित संस्थांचे अनेक संचालक हे विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांशी संबंधित असल्याने जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. नगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात 70,श्रीगोंदा तालुक्यात 81,पाथर्डी तालुक्यात 19 व नेवासे तालुक्यात 6 अशा एकूण 176 चारा डेपो व छावणी चालविणा-या संस्थांच्या विरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शेवगाव तालुक्यातील रांजणी गांवातील सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब गायके यांनी माहितीच्या अधिकारा अंतर्गत माहिती मिळवून नगर जिल्ह्यात चारा डेपो व छावण्यांमध्ये 200 कोटींहून अधिक रकमेचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली होती. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार चारा डेपो व छावणंमध्ये असलेल्या जनावरांच्या संख्येपेक्षा जवळपास तिप्पट संख्येने जनावरे दाखल असल्याचे दाखवून हा गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले.

छावण्यांमधील जनावरांची प्रत्यक्ष संख्या व दाखविलेली संख्या यात मोठी तफावत आढळली होती. 2012-13 व 2013-14 या कालावधीत सुरू करण्यात आलेल्या छावण्यांमध्ये शेवगाव तालुक्यात 40 लाख व पाथर्डी तालुक्यातील छावण्यांमध्ये 74 लाख जनावरे असल्याचे दाखविण्यात आले होते. छावणी चालकांनी अधिकार्यांशी संगनमत करूनच हा गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे या घोटाळेबाज अधिका-यांवर देखील कारवाई करण्याची मागणी गायके यांनी केली आहे. नगर जिल्ह्यात असणार्या एकूण जनावरांच्या संख्येच्या तीनपट जनावरे एकाच तालुक्यात छावणीत असल्याचे दाखविण्यात आले असल्याने या गैरव्यवहाराचे गांभीर्य मोठे असल्याचे गायके यांनी म्हटले आहे.माहितीच्या अधिकारात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार घोटाळा उघडकीस आल्यानंतर गायके यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने गायके यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.उच्च न्यायालयाने सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर सर्व संबंधित घोटाळेबाज छावणी चालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासकीय यंत्रणेला मोठा झटका बसला आहे.

नगर जिल्ह्यात चारा छावणी व डेपो मध्ये 200 कोटींहून अधिक घोटाळ्याशी 426 संस्था सहभागी असल्याचा आरोप गायके यांनी केला आहे.त्यापैकी तब्बल 176 संस्थांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.चारा डेपो व छावण्या चालविणा-या संस्था चालकांपैकी अनेक लोक हे विविध राजकीय नेत्यांशी संबंधित आहेत.त्यामुळे चारा डेपो व छावणी चालकांच्या विरूध्द थेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्याने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.