भाजप – सेना आमदारांच्या रुसवाफुगवीमुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर

टीम महाराष्ट्र देशा : पावसाळी अधिवेशना आधी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, असे भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराला ग्रहण लागले आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात आयात आमदारांना मंत्रिपद मिळणार होते. त्यामुळे निष्ठावंत आमदारांमध्ये नाराजी असल्याचे दिसत आहे. तसेच आता काही महिन्यांवर विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यामुळे आमदारांची नाराजी दूर झाल्याशिवाय मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही असे सांगण्यात येत आहे.

मंत्रिमंडळ विस्तारत कोणकोणत्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार, याविषयी तर्कवितर्क लढवले जात होते. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारातील वाट्यावरून शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाली होती. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध गर्जना केल्या जात होत्या. विधानसभा निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक असल्यामुळे आताचा मुहूर्त टळला तर पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार?, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.

दरम्यान आयात आमदारांपैकी राधाकृष्ण विखे पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर यांना या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील निष्ठावंतांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या साऱ्या रुसवाफुगवीमुळे पक्ष श्रेष्ठींनी मंत्रीमंडळ विस्तार लांबणीवर टाकला आहे.