देशात आणि राज्यात युतीचचं सरकार, जनतेने ठरवले मावळातही युतीचाचं आमदार – बाळा भेगडे

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्याला कोण हवा तर मंत्री हवा आणि मंत्री कशासाठी हवा तर तो विकासासाठी हवा, असे म्हणत मावळ विधानसभेचे भाजपचे उमेदवार संजय (बाळा) भेगडे यांनी कार्ले गावाला भेट देऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी भाजप – शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रचारदौऱ्या निमित्त बाळा भेगडे यांनी कार्ले गावाला भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी भेगडे यांचे जोरदार स्वागत केले. तर आज प्रचार सभा नसून विजयी सभा असल्याचे संकेत मिळत आहे, असे म्हणत बाळा भेगडे यांनी समस्त गावकऱ्यांचे आभार मानले. भेगडे म्हणाले की, केलेल्या कामांमुळे जनतेचे प्रेम आज दिसून येत आहे. 10 वर्ष माझ्या मावळच्या जनतेने एका सामान्य कार्यकर्त्याला लोकप्रतिनिधी होण्याची संधी दिली. त्यामुळे मी आज जनतेचा आभारी आहे. फडणवीस सरकारच्या काळात तालुक्याला मंत्रीपद मिळाले. याच्या माध्यमातून तालुक्यात अनेक विकास काम करता आली. पाटबंदऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीवर पडलेले पुनर्वसनाचे शेरे काढण्यात आपण यशस्वी झालो. तसेच कोणत्याही शेतकऱ्याचा एक ही पैसा खर्च न करता आपण सरकारी पद्धतीने अधिकृत रित्या शेतकऱ्याला न्याय देण्यात यशस्वी ठरलो. तालुक्यातील इतर पायाभूत सुविधांची काम असतील ते यशस्वी रित्या पूर्ण करत आहोत. त्यात रस्त्याचं रुंदीकरण असेल, पाण्याची सोय असेल, असे अनेक प्रलंबित आणि गरजेचे प्रश्न मार्गी लावले. त्यामुळे आज मावळ तालुक्याला विकसित तालुका म्हणून ओळखले जाते, असे भेगडे म्हणाले.

आज काही नेते एका दिवसात पक्ष बदलत आहेत. भूमिका बदलत आहेत. मात्र त्याचे काही खरं नसतं आणि जनता हे सत्य जाणून आहे. त्यामुळेच आता तालुक्याला कोण हवा तर विकास करणारा नेता हवा, असे म्हणत बाळा भेगडे यांनी जनतेला मतं रुपी आशीर्वाद देण्याची मागणी केली. देशात युतीचे सरकार आहे. राज्यात ही युतीचे सरकार येणार आहे. त्यामुळे मावळातही युतीचाचं आमदार असावा. यासाठी आता तुम्हाला काम करायचं आहे, असे बाळा भेगडे यांनी कार्ले गावातील जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले.