छेडछाडीला कंटाळून नववीतील विद्यार्थिनीने घेतले पेटवून

सोलापूर : शाळेत जाता-येताना होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने पेटवून घेत आत्महत्या केली. ही घटना मोहोळ तालुक्यातील अनगर येथे घडली असून महेश जाधव असे त्या विद्यार्थिनीला छेडणाऱ्या रोडरोमिओचे नाव आहे.
पीडित विद्यार्थिनी गावातच नववीत शिकत होती. मात्र मागील काही दिवसांपासून तिला महेश जाधव हा रोडरोमिओ छेडत असल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला. त्याच्या त्रासाला कंटाळून तिने गुरुवारी सकाळी ५ वाजता अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याचे तिच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तिला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
नववीतील मुलीने रोडरोमिओच्या छेडछेडीला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी महेश जाधव याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे.