fbpx

करमाळ्याच्या विद्युतीकरणासाठी साडेतीन कोटींचा निधी मंजूर

narayan patil

सोलापूर-  करमाळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आ. नारायण पाटील यांनी दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, राजकारण बाजूला ठेऊन करमाळा शहराचा विकास साधणार आहोत. येथील विद्युतीकरणाच्या कामासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून सध्या करमाळा व कुर्डुवाडी शहराच्या विकासकामावरून जोरदार राजकारण चालू असले तरी एक लोकप्रतिनिधी या नात्याने आपण सतत या शहराच्या विकासाला प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

आयपीडीएस योजनेंतर्गत करमाळा व कुर्डुवाडीमधील एसटी व एल.टी. विद्युत वाहिनी, भूअंतर्गत केबल, जुन्या विद्युत तारा बदलणे, ट्रान्सफार्मर क्षमतावाढ आदी कामांसाठी तीन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यास यश आले आहे. लवकरच ही कामे सुरू होतील. करमाळा शहरातील एसटी बसस्थानक ते कृषी उत्पन्न बाजार समिती या प्रमुख मार्गावरील जुन्या विद्युत तारा बदलून अंडरग्राऊंड तारा बसवण्यात येणार आहेत. महावितरणकडून ही कामे चांगल्या दर्जाची केली जावीत, अशा सूचना आपण संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या आहेत. यापूर्वी करमाळा व कुर्डुवाडी बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यास निधी मिळवून दिला असून आगामी काळातही या शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा मिळवून देण्यास आपण आग्रही असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.