56 वर्षांनी मिळालेले अभियांत्रिकी महाविद्यालय राजकारणाने दीड वर्षात घालवले

praniti shinde vs vijaykumar deshmukh

सोलापूर-  सोलापूरला मंजूर झालेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होण्यापूर्वीच रद्द झाले. राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाने याबाबतचा निर्णय देऊन सोलापूरकरांना धक्काच दिला. शासकीय तंत्रनिकेतनच्या जागेतच अभियांत्रिकी सुरू करून टप्प्याटप्प्याने तंत्रनिकेतन बंद (श्रेणीवर्धन) करण्याचा हा निर्णय होता. तो अंमलात येण्यापूर्वीच ‘तंत्रनिकेतन बचाव’चा नारा देत काही संघटनांनी वातावरण कलुषित केले. हा कर्मदरिद्रीपणाच नडला अन् ५६ वर्षांनी मिळवलेल्या अभियांत्रिकीवर पाणी सोडावे लागले.विशेष म्हणजे  शेजारच्या लातूरने गुपचूप अभियांत्रिकी महाविद्यालय मिळवले.

१९६० मध्ये सोलापूरला शासकीय अभियांत्रिकी मंजूर झाले होते. परंतु तेव्हाच्या बलाढ्य नेत्याने ते कराडला नेले. त्यानंतर सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नाने ते पुन्हा मिळाले. १३ ऑक्टोबर २०१६ रोजी त्याबाबतचा शासन निर्णय झाला. त्याने आनंद व्यक्त करण्याचे सोडून काही संघटनांनी तंत्रनिकेतनसाठी टाहो फोडला. काही विद्यार्थी संघटनाही त्यात सहभागी झाल्या. आमदार प्रणिती शिंदेही तंत्रनिकेतन बचावच्या आघाडीवर होत्या. जिल्ह्यात २४ तंत्रनिकेतने असतानाही हा अट्टहास का? हे दिसले नाही. या दिशाहीन आंदोलनांनेच पदवी अभियांत्रिकी शिक्षणापासून विद्यार्थीच वंचित राहिले.

यवतमाळ, लातुरात अभियांत्रिकी आता रत्नागिरी, यवतमाळ, धुळे, जालना, लातूरच्या पुरणमल लाहोटी या तंत्रनिकेतनसह सोलापूरच्या तंत्रनिकेतनचाही निर्णयात समावेश होता. आता तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार धुळे, जालना, रत्नागिरी व सोलापूर येथील तंत्रनिकेतन आहे तसे सुरू राहतील. तर यवतमाळ शासकीय तंत्रनिकेतन व लातूर येथील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन हे टप्याटप्याने बंद होऊन तेथे अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरू होतील. ही प्रक्रिया २०१८ – २०१९ पासून सुरू होईल.

IMP