मुख्यमंत्र्यांचा भेटीनंतर उदयनराजेंचा भाजप प्रवेश ‘या’ कारणामुळे लांबणीवर

टीम महाराष्ट्र देशा : सातारचे राष्ट्रवादी कॉंग्रेस खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. खुद्द उदयनराजे यांच्याकडून देखील तसे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे ते लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याच बोलले जात आहे. उदयनराजेंनी जर असा निर्णय घेतला तर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे.

मंगळवारी उदयनराजे भोसले यांनी तातडीने मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे उदयनराजेंच्या पक्षांतरांच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे. उदयनराजे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरु आहे. त्यामुळे उदयनराजे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बरोबर होणारी भेटीला महत्व प्राप्त झाले होते.

उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याची माहिती आहे. कारण पक्षप्रवेशासाठी उदयनराजेंचा काही अटी आहेत. त्यात सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबतच व्हावी. पोटनिवडणुकीत अपेक्षित निकाल न आल्यास राज्यसभेवर नियुक्ती करावी अशी त्यांची मागणी असल्याची माहिती आहे. त्यामुळेच त्यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला आहे.

दरम्यान, भाजपमध्ये जायचं की राष्ट्रवादीत राहायचं, यासाठी उदयनराजेंनी पुण्यात एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. या बैठकीनंतर उदयनराजे पक्षांतराचा निर्णय बदलणार असल्याचं दिसत होते. तसेच कार्यकर्ते देखील आहे तिथेच स्थिर राहण्याचा सल्ला उदयनराजेंना दिला होता. भाजपमध्ये जाणं धोक्याचं ठरू शकतं,’ असंही कार्यकर्त्यांनी उदयनराजेंना सांगितले होते.