fbpx

पुणे : वर्किंग वूमन्ससाठी लष्कराने उभारलेल्या हॉस्टेलमधील महिलांना होतोय रोडरोमिओंचा त्रास

पुणे : काम करणाऱ्या महिलांना शहरात निवारा मिळावा, यासाठी लष्करातर्फे वर्किंग वूमन्स हॉस्टेलची उभारणी करण्यात आली होती. मात्र या हॉस्टेलवर राहणाऱ्या महिलांना परिसरातील रोडरोमिओंचा त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात असलेले मद्यपी आणि रोडरोमिओ महिलांची छोड काढतात, त्यांना त्रास देतात अशी तक्रार हॉस्टेलच्या व्यवस्थापकांनी बोर्ड प्रशासनाकडे केली आहे.

पुणे कॅन्टोनमेंट बोर्डाच्या बाबाजान चौकाजवळ बोर्ड प्रशासनाने काम करणा-या महिलांसाठी वसतिगृहाची व्यवस्था केली आहे. या वसतिगृहात 50 हून अधिक महिला राहतात. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या महिला याठिकाणी राहतात. मात्र अनेकदा या महिलांना रोडरोमिओ आणि मद्यपी नागरिकांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. यासंदर्भात हॉस्टेलच्या व्यवस्थापिकांनी बोर्ड प्रशासनाला पाठविलेल्या पत्रात या समस्यांचा उल्लेख केला असून, याबाबत लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बोर्डाच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी नगरसेविका प्रियंका श्रीगिरी आणि नगरसेवक विवेक यादव यांनी ही समस्या असल्याचे मान्य करत त्याठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्‍यकत असल्याचे सांगितले. वसतिगृह असलेल्या परिसरात अंधार असल्याने त्याठिकाणी रोडरोमिओ आणि मद्यपी लोकांचा जास्त वावर असतो. परिसरात वीजेच्या व्यवस्था उपलब्ध केल्यास हा वावर कमी होईल, असे श्रीगिरी यांनी सांगितले.

यासंदर्भात व्यवस्था करण्याचे आदेश बोर्डाचे अध्यक्ष मेजर जनरल नवनीत कुमार यांनी बोर्डाच्या अभियांत्रिकी विभागाला दिले. तसेच वसतिगृहाचा परिसर हा ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित करावा, अशी मागणी व्यवस्थापकांकडून करण्यात आली आहे, याची खरेच गरज आहे का? याची पाहणी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार आणि वसतिगृह समितीच्या अध्यक्षा रूपाली बिडकर यांना देण्यात आले.