श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीची दुर्दशा

श्रीरामपूर / राजेश बोरुडे: सर्वसामान्य जनतेच्या करातून कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या भव्यदिव्य अशा श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीची अत्यंत दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी कार्यालयाच्या भिंती व कोपरे गुटखा, तंबाखू खाऊन मारलेल्या पिचकाऱ्यांनी रंगले आहे.

२४ ऑगस्ट २०१४  रोजी तत्कालीन कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व रामगिरी महाराज यांच्या सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दिमाखदार वास्तूचे उदघाट्न झाले होते.कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या वास्तूची योग्य काळजी न घेतल्यामुळे अल्पावधीतच सदर इमारतीचे अस्वच्छतेमुळे विद्रुपीकरण झाले आहे.

गुटखा बंदी असतानाही या कार्यालयात काही महाभाग गुटखा खाऊन ठिकठिकाणी पिचकाऱ्या मारून सदर कार्यालय घाण करण्याचे काम करत आहेत. इमारतीत प्रवेश केल्यानंतर समोरच असलेल्या जिन्याखाली गुटखा, तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारण्याचे काम काही महाभाग राजरोसपणे करत आहेत.

अशाच पद्धतीने कार्यालयाच्या अनेक भिंती व कोपरे गुटखे व तंबाखू खाऊन मारलेल्या पिचकाऱ्यांनी रंगले आहेत. तसेच स्वच्छतागृहाशेजारीच अगदी जवळच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेजारच्या चारपाच तालुक्यांमधून वाहनांची नोंदणी, वाहन चालक परवाना आदी अनेक कारणासाठी या कार्यालयांत रोज शेकडो लोक येत असतात अशावेळी त्यांना पीण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे ; परंतु स्वच्छतागृहाशेजारीच पाण्याची व्यवस्था असल्यामुळे लोक तिथं सहसा पाणी पित नाहीत.

कार्यालयात असणाऱ्या सर्वच स्वच्छतागृहांची अत्यन्त दुर्दशा झाली असून तेथे घाणीचे साम्रज्य निर्माण झाले आहे. एकिकडे शासन स्वच्छ भारत अभियानाच्या जनजागृतीसाठी जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे तर दुसरीकडे शासकीय कार्यालयांमधेच घाणीचे साम्रज्य निर्माण होत असल्यामुळे स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फसला जात असल्याचेच चित्र पाहावयास मिळत आहे.