सेनेसोबतच्या युतीच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्यातील भाजप नेते आमनेसामने

टीम महाराष्ट्र देशा- आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात महाराष्ट्रातील खासदारांची नुकतीच दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शहांसोबत भेट झाली. या बैठकीत युतीसंदर्भात अमित शहांनी आक्रमक भूमिका घेतली. काही गमावून अजिबात युती होणार नाही अशी स्पष्ट भूमिकाच यावेळी त्यांनी बोलून दाखवली. असे असताना महाराष्ट्रातील नेत्यांना मात्र शिवसेनेसोबत युती हवी असल्याचं चित्र आहे.

शाह यांनी खासदारांना सर्वच जागांवर तयार रहा,युतीच नंतर बघू असे आदेशच दिले आहेत.भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये युतीसंदर्भात बोलणी सुरू व्हायची असली तरी पुढील निवडणुकांसाठी भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्रित येतील असा विश्वास वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा विश्वास बोलून दाखवला.

दोन्ही पक्ष समविचारी आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी व्यक्तिगत राग, लोभ बाजूला सारून दोन्ही पक्ष एकत्र लढतील. दोन्ही पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीला संधी प्राप्त करून देण्याची चूक करणार नाहीत असं देखील त्यांनी म्हटलं आहे.दरम्यान,या निमित्ताने शिवसेनेसोबत युती करण्याच्या मुद्द्यावरून भाजपातील अंतर्गत मतभेद देखील समोर आले आहेत.