पराभव जिव्हारी, ज्येष्ठ नेत्यांऐवजी तरुणांना संधी देण्याचे पवारांचे संकेत

sharad-pawar

टीम महाराष्ट्र देशा : बीड-उस्मानाबाद-लातूर विधानपरिषद निवडणुकीत पराभवानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी काळात पक्षात मोठे बदल करण्याचे संकेत दिले आहेत. ज्येष्ठ नेत्यांऐवजी तरूण पिढीला संधी देण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही गरज ओळखून आता पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी तरुण रक्ताला वाव द्यायला पाहिजे असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केले.

बीड- लातूर – उस्मानाबाद विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी घेण्यात आली असून भाजपचे सुरेश धस हे विजयी झाले आहेत. काल न्यायालयाने फटकारल्यानंतर आज तातडीने मतमोजणी घेण्यात आली आहे. अटीतटीच्या लढाईत कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते यामध्ये अखेर धस यांनी राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला आहे.बीड-उस्मानाबाद-लातूर विधानपरिषद निवडणुकीत झालेला पराभव पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागला असल्याचे दिसत आहे.

या पराभवानंतर कुर्डूवाडीतील एका कार्यक्रमात बोलत असताना आगामी काळात पक्षात मोठे बदल करण्याचे संकेत दिले आहेत.ज्येष्ठ नेत्यांऐवजी तरूण पिढीला संधी देण्याची गरज असून ही गरज ओळखून आता पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी तरुण रक्ताला वाव द्यायला पाहिजे. याची सुरुवात मी स्वत: बारामतीत माझ्या ऐवजी सुप्रियाला संधी दिली आहे.जेष्ठांनी जागा अडवून ठेवली तर तरुणांना वाव मिळणार नाही असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केले.