fbpx

गणेश भुतकर हत्या प्रकरणी फरार आरोपींचा शोध सुरू

shanishingnapur-murder-case

सोनई : संपूर्ण देशभर प्रसिध्द असलेल्या शनिशिंगणापूर येथे दोन गुन्हेगारी टोळ्यांमधील आर्थिक वादाच्या कारणातून गणेश भुतकर या कुख्यात गुंडाचा कु-हाड व तलवारीने मारहाण करून खुलेआम हत्या करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. खुनाची ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. दरम्यान या घटनेनंतर शनिशिंगणापूरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

खून झालेल्या गणेश भुतकर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी गुरूवारी दुपारपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. शनिशिंगणापूर मध्ये एकेकाळी मित्र असलेले गणेश भुतकर व अविनाश बानकर यांच्यात काही आर्थिक कारणावरून मोठे वाद झालेले होते.बुधवारी सायंकाळी शनिशिंगणापूर मधील वाहनतळाजवळ गणेश भुतकर उभा असतांना अविनाश बानकर,लखन ढगे,अर्जुन महाले,मयुर हरकल आदिंनी तलवार व कु-हाडींच्या सहाय्याने गणेश वर जोरदार हल्ला केला.या हल्ल्यात आरोपींनी गणेश भुतकरला पळून जाण्याची संधी दिलीच नाही.अतिशय निर्घृणपणे हल्लेखोरांनी भुतकरवर कु-हाडी व तलवारीने वार केले.त्यामुळे गंभीर जखमी होऊन भुतकर खाली कोसळल्यानंतर हल्लेखोर पसार झाले.घटनास्थळी दोन गावठी पिस्तुल(कट्टे) आढळून आल्याने तेथे गोळीबार झाल्याची देखील जोरदार चर्चा आहे.

गंभीर जखमी स्थितीत गणेश भुतकर ला नगर येथे जिल्हा सरकारी रूग्णालयात हलविण्यात आले.मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाला.भुतकरचा मृत्यु झाल्याची माहिती कळताच शनिशिंगणापूर मध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता.मात्र पोलीस बंदोबस्तात वाढ केल्याने तणाव निवळला.बुधवारी रात्री गणेश भुतकरचा मृत देह औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.तसेच रात्री उशीरा शनिशिंगणापूर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान शनिशिंगणापूर मध्ये अतिशय वाहतुकीचा व वर्दळीचा परिसर असलेल्या वाहन तळाजवळच भुतकर वर हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली. बुधवारी रात्री पासूनच फरार आरोपींच्या शोधासाठी पोलस पथके रवाना करण्यात आली असली तरी गुरूवारी दुपारपर्यंत कोणालाही अटक झालेली नव्हती.