fbpx

खा. संजय काकडे यांची खंडपीठासाठी बारच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

sanjay-kakde

पुणे – पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू व्हावे, या मागणीसाठी पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने खासदार संजय काकडे यांची शुक्रवारी भेट घेतली. त्यावेळी खंडपीठासाठी जागा आणि निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन काकडे यांनी दिले आहे.पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष पवार, उपाध्यक्ष ऍड. भूपेंद्र गोसावी, ऍड. रेखा करंडे, सचिव ऍड. संतोस शितोळे, ऍड. लक्ष्मण घुले, हिशेब तपासणीस ऍड. सुदाम मुरकुटे, खजिनदार ऍड. प्रताप मोरे, ऍड. विजयसिंह ठोंबरे, ऍड. आनंद केकाण उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातून मुंबई उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या दाव्यांचे प्रमाण हे 60 टक्के असून कोल्हापूरच्या तुलनेत ते अधिक आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यातच व्हावे, अशी मागणी मागील आठवड्यात केंद्रीय रस्ते, वाहतूक व दळणवळण नितीन गडकरी यांच्याकडे खासदार संजय काकडे यांनी केली आहे.

पुणे व कोल्हापूर विभागातून मुंबई उच्च न्यायालयात जाणाऱ्या दाव्यांची संख्या पाहिल्यास 60 टक्के दावे हे पुण्यातील आहेत. त्यामुळे पुण्यात खंडपीठ होणे ही गरज आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाजाला गती मिळेल. अशी भूमिका काकडे यांनी यावेळी मांडली.यावेळी शहरात खंडपीठ सुरू करण्यासाठी सर्वत्तोपरी प्रयत्न करणार आहे. खंडपीठाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. फडणवीस आणि बारच्या शिष्टमंडळाची भेट घडवून आणण्याचे आश्वासन काकडे यांनी यावेळी दिले.