‘सामाजिक सलोखा’ यात्रा ताकदीने काढण्याचा निर्धार

Bhima-Koregaon violence

सांगली : ‘भीमा- कोरेगाव’ घटनेच्या पार्श्वभूमीवर रविवार दि. १४ जानेवारी रोजी आयोजित सामाजिक सलोखा यात्रा मोठ्या ताकदीने काढण्याचा निर्धार सांगली जिल्हा प्रशासन व सर्वपक्षीय कृती समिती यांच्यात मंगळवारी झालेल्या बैठकीत करण्यात आला. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीस पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा, सांगली महापालिका आयुक्त रविंद्र खेबूडकर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक शशिकांत बोराटे, जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, सर्वपक्षीय कृती समितीचे मुख्य निमंत्रक सतीश साखळकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते महेश खराडे, शिवसेनेचे युवा नेते माजी नगरसेवक पृथ्वीराज पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांगली शहर अध्यक्ष अमर पडळकर व मदन पाटील युवा मंचचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष आनंदा लेंगरे आदी उपस्थित होते.

‘भीमा- कोरेगाव’नंतर सांगली शहरासह जिल्ह्यातील वातावरण काहीसे भीतीमय अस्वस्थ झाले आहे. सांगलीकरांत शांतता व एकोपा निर्माण व्हावा, सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने बुधवार दि. १० जानेवारी रोजी सामाजिक सलोखा यात्रेचे आयोजन केले होते. मात्र कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील, विजयकुमार काळम- पाटील व सुहेल शर्मा यांनी ही सामाजिक सलोखा यात्रा बुधवारऐवजी रविवार दि. १४ जानेवारी रोजी काढावी, असे आवाहन सर्वपक्षीय कृती समितीस केले.

त्यास सर्वपक्षीय कृती समितीने अनुमती दिली. त्यानुसार ही सामाजिक सलोखा यात्रा काढण्यात येणार आहे. सांगली शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील चौकातून या यात्रेस सुरूवात होणार आहे. राम मंदिर चौक, पंचमुखी मारूती रस्ता, तरूण भारत क्रीडांगण, सांगली महापालिका परिसर, स्टेशन चौक व आझाद चौकमार्गे ही यात्रा छत्रपती शिवाजी क्रीडांगण येथे येणार आहे. त्याठिकाणी या यात्रेची सांगता होणार आहे. सिने अभिनेते अक्षय कुमार, नाना पाटेकर, विश्वास नांगरे- पाटील, विजयकुमार काळम- पाटील, सुहेल शर्मा, रविंद्र खेबूडकर व सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी या यात्रेचे नेतृत्व करावे, अशी विनंती सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने करण्यात आली. या यात्रेचे नेतृत्व कोणत्याही राजकीय अथवा संघटनेच्या नेते, पदाधिकारी अथवा कार्यकर्त्याने करू नये. या यात्रेत सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे.
मात्र राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून एक भारतीय या नात्याने संबंधितांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले. त्याला सांगली जिल्हा प्रशासनानेही सहमती दर्शवली. या यात्रेत विद्यार्थिनी व शासकीय- निमशासकीय कर्मचा-यांसह समाजातील सर्वच घटकांनी सहभागी व्हावे व ही सामाजिक सलोखा यात्रा यशस्वी करून आपली सांगली शांत असल्याचा संदेश द्यावा, असे आवाहन विजयकुमार काळम- पाटील यांनी केले.