आरटीई प्रवेशाचे अर्ज मोबाईल ॲपद्वारेही भरता येणार

-righttoeducationact

पुणे- शिक्षण हक्क कायद्यांतर्गत देण्यात येणारे 25 टक्के आरक्षित प्रवेशाची प्रक्रिया यंदा नेमकी कशी असेल याबाबतची नियमावली शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. आरटीई प्रवेशासाठी यंदा ॲप विकासित करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरु झाली असून 24 जानेवारीपासून पालकांना प्रवेशाचे अर्ज भरता येणार आहेत.

यंदा प्रवेश प्रक्रियेत आणखी पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून झाला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशित केले किंवा नाकारले तर त्या पालकांना शाळेकडून पावती मिळेल. यामध्ये प्रवेश झाला अथवा नाकारला याची माहिती असेल. पालकांना अर्ज भरणे सोपे जावे यासाठी मराठीचा अधिकाधिक वापर व व्हिडिओ तसेच पॉवर पाइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे. तसेच यंदा घटस्फोटीत महिला, घटस्फोट प्रक्रिया सुरु असणारे, विधवा, अनाथ व दिव्यांग बालकांसाठी वेगळी कागदपत्रे ठरविण्यात आली आहेत. त्यामुळे यांचे प्रवेश देणे आता सोपे झाले आहे.

पालकांना यंदा दहा शाळांची निवड करायची असून सुरवातीला एक किलोमीटरच्या आतील तर नंतर तीन किलोमीटरच्या आतील शाळांची निवड करावी लागणार आहे. यातील जी शाळा मिळेत त्यात प्रवेश न घेतल्यास ते प्रवेश प्रक्रियेमधूनच बाहेर पडतील. त्यांना दुसरी संधी दिली जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या नावामध्ये अथवा पत्त्यात बदल करता येणार नाही. विद्यार्थ्यांचे वय, आवश्यक कागदपत्रे, मार्गदर्शन केंद्र याबाबतची सर्व माहिती पालकांना https://rte25admission.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मराठीतही पहाता येईल.

प्रवेशाच्या तारखा –

ऑनलाईन अर्ज भरणे – 24 जानेवारी ते 12 फेब्रुवारी – पहिली लॉटरी – 14 व 15 फेब्रुवारी