न्यूझीलंडमध्ये गुंजणार नगरच्या लावण्यवतींच्या घुंगरांचा आवाज

अहमदनगर : नगर जिल्ह्यातील सुपा येथील कालिका कला केंद्राच्या संचालिका व प्रसिध्द नृत्यांगना राजश्री काळे व आरती काळे यांच्या नेतृत्वाखाली 11 कलावंतांचे पथक 12 ऑक्टोबर पासून न्यूझीलंडच्या दौ-यावर जात असून लावण्यवतींच्या घुंगरांचा आवाज आता न्यूझीलंडमध्ये ही गुंजणार आहे.

भारत सरकारच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील पारंपारिक लावणीचे कार्यक्रम न्यूझीलंडमध्ये सादर करण्यासाठी सुपा येथील राजश्री काळे व आरती काळे यांच्या पथकाची निवड केली आहे.या दौर्याविषयी माहिती देतांना राजश्री काळे म्हणाल्या,न्यूझीलंडमध्ये होणा-या पारंपारिक लावणी सादरीकरणाबरोबरच न्यूझीलंडमधील दोन शहरांमध्ये तेथील कलावांतांना लावणीचे प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे.

या प्रशिक्षणा दरम्यान लावणी,गवळण,मुजरा असे पारंपारिक नृत्यप्रकार देखील शिकविले जाणार आहेत.तसेच या दौर्यामध्ये लावणीच्या दृष्टीने महत्वाचे असणारे गण,गवळण,मुजरा,नृत्य,अदाकारीची लावणी,बैठकीची लावणी,श्रृंगारीक लावणी,छक्कड,खंडोबाचे जागरण गीत असा वैविध्यता असलेला 2 तासांचा लावणी दर्शन हा विशेष कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या पूर्वी देखील कालिका कला केंद्राच्या या लावण्यावतींनी राशया,जपान,इंडोनेशिया या देशांमध्ये सादर केलेल्या लावणीच्या कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

अभिनयाला भाषेची कोणतीही अडचण नसते. केवळ चेहेर्यावरील हावभाव,नृत्यमुद्रा यांच्या माध्यमातून कला रसिकांपर्यंत सहजतेने पोहोचविता येते.महाराष्ट्राची लावणी आता ग्लोबल झाली असून लावणीचा हा बाज रसिकांना प्रेमात पाडणारा आहे. राजश्री काळे व आरती काळे यांच्या बरोबर या दौ-यात प्रसिध्द ढोलकी वादक पांडुरंग घोटकर,कृष्णा मुसळे,सुधीर जवळकर(हार्मोनियम),स्मिता उर्फ किर्ती बने(गायिका),निवेदक नरेंद्र बेडेकर यांच्यासह कालिका कला केंद्राच्या आरती जावळे,शीतल काळे,रागिणी काळे,राणी काळे हे कलावंत देखील न्यूझीलंडच्या दौ-यात सहभागी होणार आहेत.