कोपर्डी, लोणीमावळा तपासी पोलीस पथकांना 10 लाख रूपयांचे बक्षिस

अहमदनगर: कर्जत तालुक्यातील कोपर्डी व पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचार व खूनाच्या प्रकरणात आरोपींना कठोरात कठोर म्हणजे फाशीची शिक्षा झाली आहे.आरोपींना फाशीची शिक्षा होण्यामध्ये पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणारे अधिकारी व कर्मचारी यांची भूमिका महत्वाची ठरली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: तपास करणा-या पोलिसांचे अभिनंदन केले आहे.त्यामुळे दोन्ही गुन्ह्यांचा तपास करणा-या पोलीस पथकांना प्रत्येकी 10 लाख रूपयांचे बक्षिस द्यावे,असा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रशासनाने राज्य सरकारला पाठविला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली.

कोपर्डी प्रकरणाचा तपास एलसीबीचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.शरद गोर्डे,पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णु घोडेचोर व सूरज वाबळे यांच्या पथकाने केला.कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: खास पत्र पाठवून या चौघांचे अभिनंदन केले आहे. आता 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी मुख्यमंत्र्यांनी पाठविलेले हे पत्र देऊन चौघांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.तसेच पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथील अत्याचार व खुनाच्या प्रकरणाचा तपास देखील पोलीस पथकाने अतिशय गांभीर्याने केलेला असल्यामुळेच या प्रकरणातही तीनही आरोपींना फांशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.त्यामुळे कोपर्डी व लोणी मावळा प्रकरणी तपास करणा-या पोलीस पथकांना प्रत्येकी 10 लाख रूपयांचे बक्षिस द्यावे,असा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रशासनाने सरकारकडे पाठविला आहे.