२ ऑक्टोबरची पेन्शन दिंडी हे शासकीय कर्मचाऱ्यांच्या इतिहासातील ‘ न भूतो’ असे आंदोलन ठरणार!

मुंबई/ टीम महाराष्ट्र देशा  : गेले तीन वर्षे जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून सरकारच्या विरोधात आंदोलने, मोर्चे करून आक्रोश करणारी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना येत्या २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त सरकारला जाग आणण्यासाठी पेन्शन दिंडी काढणार आहे.! ठाणे तीन हात नाका ते मुंबई मंत्रालय अशी ही पेन्शन दिंडी होणार असून त्यांनतर मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याची माहिती संघटनेचे मुख्य राज्य संपर्क प्रमुख तथा मीडिया प्रमुख प्राजक्त झावरे-पाटील यांनी दिली. तसेच ही दिंडी हे शासकीय कर्मचाऱ्यांच्या इतिहासातील ‘ न भूतो’ असे आंदोलन ठरणार असल्याची खात्री आहे असेही ते म्हणाले.

जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी मंत्रालयावर धडकणार!

१ नो. २००५ नंतर नोकरीस लागलेल्या सरकारी, निमसरकारी, सरकारशी संलग्नित स्वायत्त संस्था यातील कर्मचारी यांना सरकारने जुनी पेन्शन योजना नाकारली असून, त्यांना अन्यायकारक नवीन पेन्शन योजना लागू केली आहे, त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांमध्ये या बाबत नाराजीचा सूर आहे. या विरोधात नागपूर अधिवेशनावरील आक्रोश मोर्चे, मुंबई अधिवेशनवरील मुंबईचे धरणे अश्या ५० हजाराहून अधिक मोठया संख्येचे आंदोलन संघटनेने केले आहेत. मुंबईतील आंदोलनाची दखल घेऊन नामदार दिपक केसरकर यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सरकारने मृत कर्मचारी यांच्या कुटुंबाला १० लाख देण्याची घोषणा केली परंतु सेवेच्या सुरवातीच्या दहा वर्षात जर कर्मचारी मयत झाला तरच त्याला सरकारकडून १० लाख रु मदत मिळणार असल्याची अट त्यात टाकल्याने व कुटुंब निवृत्तीवेतन देण्याऐवजी अशी मदत देऊन पुन्हा सरकार चेष्टा करत असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाल्याने आता आर-पारची लढाई करण्याचे संघटनेच्या बैठकीत ठरले आहे, असेही ते म्हणाले.

२ ऑक्टोबर रोजी ठाणे ते शिवाजी पार्क व ३ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क ते मंत्रालय असा पेन्शनदिंडीचा मार्ग असणार आहे. त्यानंतर आमरण उपोषण करणार असून मागण्या मान्य होईपर्यंत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राज्याध्यक्ष वितेश खांडेकर , सचिव गोविंद उगले यांनी दिला आहे. या दृष्टीने नियोजन धडाक्यात सुरू असून सर्व कर्मचारी वर्गातून या निर्णयाचे स्वागत होत असल्याची भावना व्यक्त केली जात असून या आंदोलनाची इतिहासात नोंद होईल, अशी चर्चा कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहे
.

You might also like
Comments
Loading...