fbpx

अधिकच्या मतदानाने पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता

ठाणे/प्राजक्त झावरे पाटील : काल पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात मतदारांनी प्रचंड उत्साह दाखवला आहे. मुसळधार पाऊस पडत असताना सुद्धा मुंबई पदवीधर मतदारसंघात ५३.२३ टक्के ,मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी ८३.२६ ,कोकण पदवीधर मतदार संघात ७३.८९ तर नाशिक शिक्षक मतदार संघात ९२.३० टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे.. प्रत्येक मतदारसंघात एकहाती कोणी निवडून येईल अशी शक्यता सुरवातीपासूनच नव्हती. त्यात वाढलेल्या प्रतिसादाने प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.

या मतदारसंघांचा आढावा घेतला असता कोकण पदवीधरचा पूर्ण निकाल ठाण्यात कोण बाजी मारणार यावर अवलंबून असून सेनेचे संजय मोरे, भाजपचे निरंजन डावखरे, राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांचे नशीब पेटीबंद झाले आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघाएवढी चुरस कोणत्याच मतदारसंघात नसल्याचे सर्वच जाणकार मान्य करत आहेत.

लोकभारतीचे कपिल पाटील, शिवसेनेचे शिवाजी शेंडगे, तर भाजप पुरस्कृत अनिल देशमुख अश्या तीन उमेदवारांमध्ये काट्यांची टक्कर दिसून येत आहे. मुंबई पदवीधर हा पूर्वीपासून सेनेचा बालेकिल्ला असून त्यात भाजपच्या अमित मेहता यांच्या उमेदवारीने विलास पोतनीस यांच्या समोर आव्हान उभे केले आहे. तर नाशिक शिक्षक मतदारसंघात आघाडीचे संदीप बेडसे, सेनेचे किशोर दराडे तर भाजपचे अनिकेत पाटील यांच्यात मुख्यत: लढत दिसून येत आहे.

एकंदरीत, वाढलेल्या मतदानाने नक्की कोण बाजी मारणार हे छातीठोकपणे कोणीच सांगू शकत नाही, त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. मोठ्या प्रमाणात झालेल्या मतदानामुळे मतदारांनी कोणाला कौल दिला हे येत्या २८ तारखेला होणा-या मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होईल.