वीज कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी महावितरण आग्रही

सातारा : वीजबिल थकबाकी वसुलीसाठी जाणाऱ्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचे प्रकार राज्यात दिवसेंदिवस वाढत असल्याच्या घटना गांभीर्याने घेत मारहाण करणाऱ्यांविरोधात कठोर पोलीस कारवाई करण्याबाबत आग्रही असल्याचे संकेत महावितरण प्रशासनाने दिले आहेत. महावितरण ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असल्याने नफा कमावणे हा महावितरणचा उद्देश नाही. मात्र महावितरणचे अस्तित्त्व हे विकलेल्या प्रत्येक युनिट विजेचे पैसे वसूल होण्यावर अवलंबून आहे. वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्याने महावितरणला आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे, ही परिस्थिती लक्षात घेता ग्राहकांनी वीज देयकांचा नियमित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरण कर्मचारी ऊन, वारा, पावसात ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम करीत असतात. मात्र अनेकदा त्यांना ग्राहकांच्या रोषाला विनाकारण बळी पडावे लागते. परंतु ज्या शासकीय कर्मचाऱ्यांचा थेट जनतेशी प्रत्यक्ष संबंध येतो व ज्यांना जनतेच्या रोषाला बळी पडावे लागते व प्रसंगी मारहाण होते, अशांसाठी भा.दं.वि.च्या कलम ३५३ अन्वये आरोपीला कठोर शिक्षेची तरतूद आहे. या कलमाचा आधार घेत मागील काही दिवसांत झालेल्या हल्ल्यातील घटनांमध्ये महावितरणने हल्लेखोरांविरोधात कठोर भूमिका घेतल्याने बहुतांश आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी महावितरण प्रशासन पाठपुरावा करीत आहे.

वीज कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३,३३२,५०४ व ५०६ अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात येत असून, कलम ३५३ नुसार आरोपीला दोन वर्षापर्यंत कैद आणि दंडाची तरतूद आहे. कलम ३३२ नुसार तीन वर्षापर्यंत कैद आणि दंडाची तरतूद असून कलम ५०४ व ५०६ नुसार प्राणांकित हल्ल्याच्या आरोपाखाली कठोर शिक्षेची तरतूद आहे. या सर्व कलमांचा कठोर वापर करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नरत आहे.

वीज कर्मचाऱ्यांना होणा-या मारहाणीच्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता महावितरण प्रशासनाने आरोपींना तात्काळ अटक व्हावी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी याकरिता प्रशासनाने संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. वीज थकबाकी वसूल करायची नाही, विजेची चोरी पकडायची नाही, गळती थांबवायची नाही, शासकीय सेवा ह्या मोफत वापरायसाठीच असल्याच्या थाटात काही ग्राहक वागत असल्याने महावितरणपुढे ग्राहकांकडील थकबाकीचा डोंगर उभा राहिला आहे. थकबाकी वसूल केल्याशिवाय ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा करणे अशक्य असल्याने अशा पद्धतीने महावितरणचा कारभार कसा चालवायचा, असा प्रश्न महावितरणपुढे निर्माण झाला आहे.

महावितरण कार्यालयांना घेराव घालणे, कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवणे, तोडफोड-जाळपोळ करणे हे प्रकार होत असतील तर महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काम तरी कसे करायचे? असा प्रश्न कर्मचारी संघटना वारंवार उपस्थित करीत आहेत. उद्दिष्टाप्रमाणे वीज थकबाकी वसूल न झाल्यास वीजपुरवठा करणे अशक्य होईल. तरी वीज ग्राहकांनी महावितरणची बाजूही समजून घेणे आवश्यक आहे. थकबाकीपोटी आपला वीजपुरवठा खंडित केल्यामुळे काही थकबाकीदारांनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, कार्यालयाची तोडफोड करणे हे प्रकार अलीकडच्या काळात राज्यात सर्वत्र वाढले आहेत, संबंधितांविरुद्ध गुन्हेही दाखल झाले आहेत.