भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी नगरमध्ये मूक मोर्चा

Bhima-Koregaon violence

अहमदनगर: भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी रोजी दलितांवर झालेले जीवघेणे हल्ले, जाळपोळ व महिलांशी दुर्व्यवहार केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (5 जानेवारी) विविध दलित संघटनांच्या वतीने भीमसैनिकांच्या मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात नगर जिल्ह्यातील भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती माजी नगरसेवक अजय साळवे, सुनील क्षेत्रे, कॉम्रेड अनंत लोखंडे यांनी दिली.

5 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता कृषी उ.बाजार समिती समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मूकमोर्चाला सुरूवात होणार आहे. तोंडाला काळी पट्टी लावलेले भीमसैनिक या मोर्चात सहभागी होणार आहेत. एसटी बस स्टँड चोकात छत्रपती शिवाजी महाराज व माळीवाडा वेशीजवळ महात्मा फुलेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पकरून हा मोर्चा बुरूडगल्ली मार्गे थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर तेथे जाहीर सभा होणार आहे.भीमा कोरेगावच्या हिंसाचाराच्या घटनेला जबाबदार असणारे संभाजी भिडे व मिलींद एकबोटे यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मुख्य मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात येणार आहे.

मोर्चाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत अजय साळवे म्हमाले की,भीमा कोरेगाव येथील हिंसाचार ही पूर्वनियोजित घटना होती.दलित व मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा हा भाजपा व आरएसएस चा डाव आहे.1 जानेवारीला भीमा कोरेगाव येथे अनेक महिलांशी दुर्व्यहार देखील केले.महिला व लहान मुलांना देखील प्रचंड मारहाण करण्यात आली.सुमारे 1200 हून अधिक गाड्या जाळण्यात आल्या.वास्तविक पाहाता भीमा कोरेगाव येथे विजय दिनासाठी मोठ्या प्रमाणावर दलित बांधव जमा होणार असल्याची माहिती असूनही हिंदुत्ववादी संघटनांना मोर्चा काढण्याची परवानगी प्रशासनाने कशी दिली,असा सवाल उपस्थित करून साळवे म्हणाले.

पुण्याचे जिल्हाधिकारी व पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक यांना तातडीने बडतर्फ करावे,अशी आमची मागणी आहे.संभाजी भिडे व मिलींद एकबोटेंविरूध्द देशद्रोह, मुष्यवधाचा व दंगलीचा असे गंभीर गुन्हे दाखल करण्याची गरज आहे. 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे घडलेला हिंसाचार माणुसकीला काळीमा फासणारा होता.तेथील दंगल ही पूर्व नियोजित होती. तेथे इमारतींच्या छतांवरून दलित बांधवांवर दगडफेक करण्यात आली.तसेच दंगल करण्यासाठी देखील बाहेरील माणसे आणण्यात आली होती.या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच दलित-मराठा-बहुजन समनाजात विव्देष पसरविणा-या जातीयवादी मनुवाद्यांच्या विरोधात शुक्रवारी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती सुनील क्षेत्रे यांनी दिली.