शिक्षक मतदारांच्या नाराजीचा फटका कुणाला बसणार?

maharashtra assembly

मुंबई : शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणूकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. मुंबईमध्ये शिक्षक व पदवीधर तर कोकण मध्ये पदवीधर आणि नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत.

या चारही मतदारसंघाचे विश्लेषण केले. तर दहा ते पंधरा टक्के शिक्षक मतदार ‘पदवीधर मतदार संघात’, मतदान करणार आहेत. आणि ‘शिक्षक मतदारसंघात’ हाच आकडा शंभर टक्के असणार आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात मतदारसंघ प्रभावित करणारा हा घटक शिक्षण विभागाशी संबंधित दररोज बदलणाऱ्या धोरणांवर प्रचंड नाराज असल्याचे एकंदरीत चित्र आहे. शिक्षकांची प्रचंड वाढलेली शाळाबाह्य कामे, ऑनलाइन-ऑफलाईन कामांचा अतिरेक, विना-अनुदानितच्या समस्या,  शिक्षण विभागाच्या पेटाऱ्यातून दररोज येणारे नवीन निर्णय, वेतनश्रेणीबाबतचा २३/१० चा निर्णय असे अनेक निर्णय नाराजीत अजून भर घालत आहेत. तसेच संबंधित विभागाच्या ‘मोठ्या साहेबांकडून’ अनेकदा होणाऱ्या अरेरावीबाबत दबक्या आवाजात चर्चा देखील शिक्षकांमध्ये रंगत आहेत.

एकंदरीत, शिक्षक वर्गामध्ये सध्याच्या मंत्र्यांबाबत नाराजीचा सूर उमटत आहे, त्याचा मोठा फटका या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता शैक्षणिक वर्तुळात वर्तवली जात आहे.