‘बंटी विरुद्ध मुन्ना’ वाद उफाळला; कारखान्याच्या सभेत समर्थकांमध्ये राडा

टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापूरचे माजी खासदार आणि नुकताच भाजपमध्ये प्रवेश करणारे धनंजय महाडिक आणि माजी मंत्री सतेज पाटील यांच्यातील वाद काय नवीन नाही. राजाराम साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील यांचे गट आमनेसामने आले त्यानंतर या सभेत राडा पाहायला मिळाला.

राजाराम साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा सुरु असतानाच दोन्ही बाजूकडून आपापल्या नेत्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. पाटील गटाकडून भर सभेत पत्रकं भिरकावण्यात आली. त्यामुळे या सभेत पाटील आणि महाडिक गटात तणाव निर्माण झाला होता. थोड्या वेळाने वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर समर्थकांनी माघार घेतली. त्यानंतर वातावरण शांत झाले होते.

काय आहे धनंजय महाडिक आणि सतेज पाटील वाद ?

सतेज उर्फ बंटी पाटील हे कॉंग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार आहेत तर धनंजय उर्फ मुन्ना महाडिक हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार आहेत. खरतर यांच्यातील वादाला सुरुवात झाली ती २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून, या निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांचा पाठिंबा मागितला होता. सतेज पाटील यांनीही महाडिकांना मदत करण्याचं आश्वासन दिलं आणि जोरदार प्रचार करत दिलेलं आश्वासन पाळलं देखील, त्यामुळे मोदी लाटेतही धनंजय महाडिक खासदार म्हणून निवडून आले. या निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्या विजयात सतेज पाटलांच्या सिंहाचा वाट होता.

लोकसभेनंतर विधानसभेत आघाडीत बिघाडी झाली त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने वेग-वेगळ लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सतेज पाटील आणि अमल महाडिक यांच्यात लढत झाली. अमल महाडिक हे धनंजय महाडिक यांचे चुलत भाऊ आहेत. त्यामुळे या निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी सतेज पाटलांच्या विरोधात अमल महाडिक यांचा प्रचार केला. त्यामुळे सतेज पाटलांचा पराभव झाला आणि खऱ्या अर्थाने वादाला सुरुवात झाली. लोकसभेसाठी केलेल्या मदतीची जाणीव न ठेवत महाडिक यांनी आपली फसवणूक केली असा आरोप सतेज पाटलांनी केला.

या सर्व घटनेचा बदला पाटलांनी २०१५ च्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत घेतला त्यांनी महादेवराव महाडिक यांचा पराभव केला. महादेवराव महाडीक हे धनंजय महाडिक यांचे चुलते आहेत.त्यामुळे हा वाद चिघळला. तेव्हापासून कोल्हापूर जिल्ह्यात मुन्ना महाडिक व बंटी पाटील यांच्यात हाडवैर निर्माण झाले आहे. त्यानंतर जिल्हा परिषद, महापालिका, गोकुळ दूधसंघ निवडणूक किंवा साखर कारखान्याची निवडणूक अश्या प्रत्येक निवडणुकीत मुन्ना विरुद्ध बंटी असा संघर्ष पाहायला मिळाला आहे.