शेतकऱ्याचा मुलगा उद्योगपती झाला पाहिजे – महादेव जानकर

महादेव जानकर

ठाणे: महाराष्ट्रातील शेतकरी हा भरपूर मेहनत करणारा आहे. त्याच्या शेतमालाला योग्य ती बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आमचे सरकार नेहमी प्रयनशील असते. आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी हा भविष्यात मोठा उद्योगपती झाला पाहिजे, असे वक्तव्य दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले. जानकर हे कोकण ग्राम विकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सवात बोलत होते.

राज्यातील आणि केंद्रातील सरकार हे भाजपचे आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या सधन आणि उद्योजक झाला पाहिजे असे वाटते. त्या दृष्टीने मी आणि माझे सहकारी काम करीत असून शेती, मत्स्य, पशुसंवर्धन, तसेच डेअरी व्यवसायाकरिता सरकार नेहमी प्रोत्साहन देत असते. भूमिपुत्र शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या धान्याला , वस्तूला, मत्स्य पालनाला चांगले मार्केट मिळणे आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे महिला बचत गटामार्फत उद्योग करणाऱ्या महिलांसाठी आपण महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करून त्यांना योग्य त्या प्रकारचे साहाय्य तसेच मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मालवणी महोत्सवाच्या ठिकाणी कोकणातील तसेच वाडा, पालघर, विदर्भ, पुणे, कोल्हापूर येथील शेतकऱ्यांचा समावेश आहे. या ठिकाणी असलेल्या मत्स्य, तांदूळ, तसेच बचत गटाच्या दुकानांना महादेव जानकर यांनी भेट देऊन त्यांच्याशी सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीविषयी चर्चा केली. तसेच आयोजक सीताराम राणे यांचे असा उपक्रम राबवत असल्याबद्दल कौतुक केले.