कोरेगाव भीमा दंगलीतील विस्थापित कुटुंबाचे महानगर पालिकेच्या सदनिकेत पुनर्वसन

पुणे : कोरेगाव भीमा दंगलीतील विस्थापित अशोक आठवले आणि सुरेश सकट यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन पुणे महानगर पालिकेच्या सदनिकेत करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशावरून उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी यासंदर्भात सतत पाठपुरावा केला होता. तसेच ही दोन्ही विस्थापित कुटुंबे एक जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसले होते.

आठवले आणि सकट कुटुंबाना सदनिका देण्याच्या आदेशाचे पत्र उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्या हस्ते कुटुंब प्रमुखांकडे देण्यात आले. प्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे राज्य सरचिटणीस बाळासाहेब जानराव, शहर पदाधिकारी शैलेश चव्हाण, महिपाल वाघमारे, अशोक शिरोळे व इतर मान्यवर उपस्थित होते. आठवले कुटुंबाने आपले धरणे आंदोलन थांबवल्याचे जाहीर करून सर्वांचे आभार मानले.

जानेवारी महिन्यात भीमा कोरेगाव येथे उसळलेल्या दंगलीत सकट व आठवले कुटुंबाचे राहते घर जळाले होते. परिणामी ही दोन्ही कुटुंबे बेघर झाली होती. दंगलग्रस्तांसमवेत त्यांना घरकुल देण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, सध्या त्यांना कोणताही निवारा नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात निवारा उपलब्ध करून देण्याच्या सूचना रामदास आठवले यांनी दिल्या होत्या. त्यानुसार उपमहापौर डॉ. धेंडे यांनी प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे पालिकेच्या सदनिकेत त्यांची व्यवस्था झाली आहे.

पालिकेच्या चाळ विभागाकडील कसबा पेठेतील कॉलनी क्रमांक ५ मधील दोन सदनिका या दोन कुटुंबियांना दिल्या आहेत. या सदनिका ११ महिन्यांकरिता आहेत. सदरची दोन्ही कुटुंबे दंगलग्रस्त असल्याने त्यांच्याकडून प्रति महिना एक रुपया इतके भाडे आकारले जाणार असून, वीजबिल सदनिका धारकांनी भरायचे आहे, असे आदेशात नमूद केले आहे.

Gadgil