कोल्हापूर महापालिका : वाचा काँग्रेससाठी शिवसेनेने एवढी उदारता का दाखवली ?

टीम महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे :- कोल्हापूर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेच्या भूमिकेमुळे काँग्रेससाठी शिवसेनेनं त्याग केल्याची चर्चा कोल्हापुरात व महापालिका वर्तुळात चालली आहे. या निवडणुकीत काँग्रेस, भाजपा ताराराणी आघाडी व शिवसेना यांनी उमेदवार उभे केले होते, परंतु ऐनवेळेस शिवसेनेनं माघार घेतली व त्यांचे नगरसेवक मतदान प्रक्रियेपासून तटस्थ राहिल्याने जाणकार राजकीय विश्लेषकांच्या मते ही काँग्रेस व शिवसेनेमधील आपापसातील सेटिंग आहे.

कोल्हापूर महापालिकेत पक्षीय बलाबल पाहता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे ४४ नगरसेवक आहेत, तर भाजपा ताराराणी आघाडीचे ३३ नगरसेवक आहेत व शिवसेनेचे ४ नगरसेवक आहेत. भाजपा ताराराणी आघाडीला शिवसेना मदत करेल असे वाटत होते व काही नाराज काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक मदत करतील असेही वाटत होते. परंतु राज्यात आणि देशातही शिवसेना भाजपासोबत आहे, पण त्यांच्यातील मतभेद सर्वज्ञात आहेत. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणात शिवसेनेचे चार नगरसेवक गेल्या अडीच वर्षापासून काँग्रेस आघाडीसोबतच होते. या बदल्यात शिवसेनेला सलग दोनवेळा परिवहन समितीचे सभापती पद देण्यात आले. यावेळी मात्र महापौर पदासाठी शिवसेनेकडूनच सौ. प्रतिज्ञा उत्तुरे-निल्ले यांचा व उपमहापौर पदासाठी अभिजित चव्हाण यांचा अर्ज दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली होती.

परंतु शिवसेनेच्या जागा कमी असतानाही आमदार सतेज पाटील यांनी गेली अडीच वर्षे दिलेल्या सन्मानाच्या जाणिवेतून शिवसेनेनं या निवडणुकीत त्यागाची भावना दाखवून काँग्रेसला मदत करत भाजपला इशारा केला असून येत्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत कडवं आव्हान आत्ताच निर्माण करून माईंड गेम खेळायला सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे. आता या खेळात आमदार सतेज पाटील कसा फायदा उचलतात हे पाहणे येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत औत्सुक्याचे असणार आहे, की भाजप नेते चंद्रकांत पाटील काही नवीन डाव टाकत आमदार पाटील यांना शह देतात हेही पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.