…तर भाजपला पुन्हा सत्तेत येण्याची संधी मिळेल ?

टीम महाराष्ट्र देशा- कर्नाटक विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्यात भाजपचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना अपयश आले आहे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आज कर्नाटक विधानसभा सभागृहात भाजपला विश्वासदर्शक ठराव मांडायचा होता. मात्र, दिवसभराच्या पळापळीनंतर देखील भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश येत असल्याच दिसल्याने येडीयुरप्पा यांनी आपण राजीनामा देत असल्याच घोषित केले.

आजवरचा कर्नाटकमधील राजकीय इतिहास पाहिला तर फोडाफोडीचे राजकारण हे चालत आलेले आहे. आता येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढे काय असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये आहे. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यामुळे राज्यपाल काँग्रेस आणि जेडीएसला सत्ता स्थापनेसाठी वेळ देतील. हा कालावधी नेमका किती असेल, यावर बरंच काही अवलंबून असणार आहे.

हा कालावधी जास्त असल्यास 78 आमदार असलेल्या काँग्रेसला आणि 37 आमदार असलेल्या जेडीएसला फोडाफोडीची भीती असेल. हा कालावधी कमी असल्यास काँग्रेस आणि जेडीएसला फायदा होईल. त्यांना फोडाफोडी टाळता येईल आणि बहुमत सिद्ध करुन सत्ता स्थापन करता येईल. मात्र भाजप सत्ता मिळविण्यासाठी काय करू शकते याचा अंदाज सर्वांनाच आला आहे त्यामुळे भाजपने जर पुन्हा फोडाफोडी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात जर ते यशस्वी झाले तर कर्नाटकमधील सध्याचे चित्र पालटू शकते.

भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश येत असल्याच दिसल्याने येडीयुरप्पा यांनी आपण राजीनामा देत असल्याच घोषित केल्यानंतर भाजपची चांगलीच नाचक्की झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजप सद्यस्थितीत हे पाऊल उचलेल याची शक्यता कमीच आहे. असे जरी असले तरी राजकारणात कोणत्याही शक्यता नाकारता येत नाहीत त्यामुळे कॉंग्रेस-जेडीएस यांच्यासमोरील बहुमत सिद्ध करण्याचे मोठे आव्हान कायम असणार आहे.असं जर झाले तर राष्ट्रपती राजवटीची,आणि राजकीयदृष्ट्या अस्थिरतेची देखील शक्यता देखील राजकीय जाणकारांनी वर्तवली आहे.