करमाळा : राजकीय कुरघोड्या अन् फोडाफोडीला आले उधाण

करमाळा- सध्या करमाळा विधानसभा मतदारसंघात सोशल मिडीयावर विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे, विधानसभा निवडणूकीला एक ते दीड वर्षे अवधी असला तरी आपापल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार आतापासूनच सुरू आहे. प्रचार करताना करताना स्थानिक कार्यकर्ते एकमेकांवर सोशल मिडीयाच्या माध्यमातून मिमिक्रीमधुन कुरघोड्या करु लागले आहेत. या कुरघोड्यांमुळे राजकिय वातावरण अधिकच तापत असुन त्याशिवाय एकमेकांबद्दल द्वेषाची भावना निर्माण होऊन भांडणाला आमंत्रण मिळु लागले आहे.

सध्या सोशल मिडीयाचे वापर वाढला आहे. शिवसेनेचे आमदार नारायण पाटील, राष्ट्रवादीच्या रश्मी बागल तसेच माजी आमदार जयवंत जगताप आणि जि प अध्यक्ष संजय शिंदे यांच्यात आगामी विधानसभा निवडणूक रंगणार आहे. सध्या कुरघोड्या आणि फोडाफोडीचे राजकारण तालुक्यात पहायला मिळत आहे. तसेच यामध्ये छोटे-मोठे कार्यकर्ते ही सक्रीय झालेले आहेत. आपआपल्या नेत्याचा प्रचार तसेच विरोधकांवर टीका सध्या सोशल मिडीया वर पहायला मिळत आहे. सोशल मिडीयावर एकमेकांविरोधात कुरघोड्या अन् खेचाखेची सुरू आहे. परिणामी करमाळा तालुक्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे.

शिवसेनेचे नारायण पाटील यांनी आगामी निवडणूक पूर्ण ताकतीने लढविण्याचे ठरविले आहे तशा प्रकारच्या मोर्चेबांधणीला वेग आलेला आहे तर राष्ट्रवादीच्या रश्मी बागल आणि जि प अध्यक्ष संजय शिंदे तसेच माजी आमदार जयवंतराव जगताप यांनीही गावपातळीवर जाऊन विधानसभेची तयारी सुरू केलेली आहे.एकमेकांचे कार्यकर्ता फोडणे आणि आपल्याकडे खेचून आणणे अशाप्रकारे राजकारण सध्या तालुकाभर सुरू आहे.

आगामी विधानसभा निवडणूक पाटील-बागल-जगताप-शिंदे गटांमध्ये चौरंगी होणार हे जवळजवळ निश्चित झालेले आहे त्यामुळे कार्यकर्तेही चांगलेच सक्रीय झालेले आहेत सोशल मिडीयाचा पुरेपुर फायदा घेऊन राजकीय कुरघोड्या अन् खेचाखेची करून असेही-तसेही कसेही ! प्रकाराचे राजकारण करून सध्या तालुक्यातील वातावरण तापत आहे.

You might also like
Comments
Loading...