करमाळ्याच्या राजकारणात ‘यंगब्रिगेड’ सक्रीय

करमाळा- सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील राजकीय आखाडा राज्याच्या कानाकोपऱ्यात पहिल्यापासून प्रसिद्ध आहे. मागील काही वर्षांपासून राजकीय आखाड्यात फड गाजविणारे धुरंधर आपल्या दुस-या पिढीला राजकारणात सक्रिय करू लागले आहेत. हे राजकीय वारसदारदेखील आपापल्या कुवतीनुसार राजकीय पटावर सक्रिय होताना दिसत आहे.या राजकीय आखाड्यात शिवसेनेचे आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप तसेच माजी मंत्री कै. दिगंबरराव बागल यांची दुसरी पिढी आघाडीवर आहे.

पृथ्वीराज पाटील

कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नसताना ग्रामपंचात सरपंच पासून पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य , सहकारी संस्था, साखर कारखाने,ते विधानसभा सदस्य पर्यंत राजकारणाची एकेक सूत्रे जिंकत सध्याचे शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांनी करमाळा तालुक्यावर पकड मजबूत केलेली आहे २०१४ विधानसभा जिंकत गेल्या साडेतीन वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर आगामी विधानसभा सोप्पी केलेली असून त्यांची दुसरी पिढीही सध्या राजकारणात सक्रीय झालेली आहे.

आमदार नारायण पाटील यांचे सुपुत्र पृथ्वीराज पाटील सध्या राजकारणात राजकारणात सक्रीय झालेले आहेत. युवासेनेच्या माध्यमातून युवा मतदारांमध्ये जाऊन त्यांनी चांगल्या प्रकारे राजकीय सुरूवात केलेली आहे तर आगामी काळात आमदार पाटील यांचा वारसदार म्हणून पृथ्वीराज पाटील यांच्याकडे पाटील गटाचे कार्यकर्ते पाहत आहेत.

वैभवराजे जगताप

दुसरीकडे घरातूनच राजकारणाचा वारसा लाभलेले माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे सुपुत्र सध्याचे करमाळा नगर पालिकेचे अध्यक्ष वैभवराजे जगताप हेही राजकारणात सक्रीय झालेले आहेत. दांडगा जनसंपर्क,युवकांच्या प्रश्नांची जाण,राजकारणाचा सखोल अभ्यास या सर्व जमेच्या बाजू असल्याने गेल्या वर्षी झालेल्या नगरपालिका निवडणूकीत जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. नगराध्यक्ष या नात्याने करमाळा तालुक्यातील जनतेची विकास कामे करण्यावर त्यांचा भर आहे. सध्या माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा वारसदार म्हणून वैभवराजे जगताप हेच राहणार असल्याचे बोलले जात आहे.

वैभवराजे जगताप हे सामान्य कार्यकर्त्यांना सहजपणे उपलब्ध असतात. सर्वसामान्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून बेधडक निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. नगराध्यक्ष या नात्याने मुख्यतः करमाळा शहरातील युवकांच्या समस्या सोडविण्यावर जगताप यांचा भर आहे युवकांची नवी फळी जगताप यांच्या पाठीमागे येत आहे.

दिग्विजय बागल, रश्मी बागल

एकेकाळी तालुकाभर माजी मंत्री कै दिगंबरराव बागल यांची पकड होती, त्यांचा २००५ साली आकस्मिक मृत्यू झाला बागल गटावर संकट आले परंतु संकटातून बाहेर येत माजी आमदार श्यामल बागल २००९ साली आमदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर त्यांची दुसरी पिढी म्हणजेच रश्मी बागल राजकारणात सक्रीय झाल्या आहेत.तालुक्यातील दोन्ही कारखान्यावर मजबूत पकड केलेली असून मागील २०१४ विधानसभा निवडणूकीत झालेल्या पराभवामुळे सध्या बागल गट बॅकफुटवर गेलेला आहे. आगामी विधानसभा कुठल्याही परिस्थिती मध्ये जिंकण्याचा त्यांचा निर्धार असून त्यांच्या बरोबर त्यांचे बंधू मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल ही राजकारणात सक्रीय झालेले आहेत.

सहानभुतीची लाट फार काळ टिकत नाही असं म्हटलं जात. दिगंबरराव बागल यांच्या निधनानंतर बागल गटाने भावनिक राजकारण करून श्यामल बागल यांना आमदार केलं मात्र या काळात लक्षात राहिलं असं कोणतही ठोस काम तालुक्यात झालं नाही. भूतकाळात जे झालं ते विसरून आता नव्या दमाने बागल गटाला वाटचाल करावी लागणार आहे.