जवखेडे हत्याकांड प्रकरणातील आरोपींकडून पोलिसाला धक्काबुक्की

Maharashtra-Police

अहमदनगर : नगर येथे जिल्हा न्यायालयात सुनावणीच्या कामासाठी आणले असता जवखेडे येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील तीन आरोपींनी पोलीसाची गचांडी पकडून त्याला धक्काबुक्की केली.तसेच आरीपोंनी पोलीसाला शिविगाळ करीत एका आरोपीने स्वत:चे डोके दरवाजावर आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला.या प्रकाराने जिल्हा न्यायालयात काही काळ चांगलाच तणाव निर्माण झाला होता.संपूर्ण राज्यभर गाजलेल्या जवखेडे येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणाची सुनावणी सध्या अहमदनगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू आहे.

जवखेडे हत्याकांड प्रकरणात दिलीप जाधव,अशोक जाधव व प्रशांत जाधव या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना सध्या अहमदनगर येथील उप जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे.तीनही आरोपींना सुनावणीसाठी जिल्हा न्यायालयात आणण्यात आले होते.त्यावेळी न्यायालयातील लॉकअपमध्ये आणल्यानंतर नियमानुसार पोलीस कर्मचारी इस्माईल शेख(नेमणुक अहमदनगर पोलीस मुख्यालय)यांनी तिघांची अंगझडती घेतली.त्याचा राग येऊन तिनही आरोपींनी तुम्ही आमच्या अंगाला हात लावू नका,असे म्हणून शेख यांना गचांडी धरून भिंतीवर ढकलले.तसेच त्यांना शिविगाळ देखील केली.दरम्यान दिलीप जगन्नाथ जाधव या आरोपीने लॉकअपच्या दरवाजावर स्वत:चे डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करून पोलीसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

पोलीस हेड कॉन्स्टेबल निसार शेख यांच्या फिर्यादीनुसार भिगार कँप पोलीस ठाण्यात तीनही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.