fbpx

चित्रपट समजण्यासाठी पद्धत नसते फक्त आनंद घ्या – महेश मांजरेकर

opening aurangabad film festival

औरंगाबाद : चित्रपट पाहणे, तो समजून घेणे यासाठी कोणतीही ठरलेली पद्धत असू शकत नाही, मात्र तो पाहताना मनापासून आनंद घ्या, मग आपोआपच चित्रपट कळायला लागतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक तथा ज्येष्ठ कलाकार महेश मांजरेकर यांनी केले.

नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन प्रस्तूत व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्रातर्फे आयोजित, 5 व्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होेते. व्यासपीठावर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेते उपेंद्र लिमये, स्मिता तांबे, नाथ ग्रुपचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, चित्रपट समीक्षक व दिग्दर्शक अशोक राणे, प्रा. अजित दळवी, सुजाता कांगो, मोहम्मद अर्शद, उद्योजक उल्हास गवळी, सतीश कागलीवाल, सचिन मुळे, निलेश राऊत, प्रा. एमी कॅटलीन, विकास देसाई यांची उपस्थिती होती.

मांजरेकर म्हणाले की, माझ्या करिअरची सुरुवातसुद्धा औरंगाबादमधील लेखक, दिग्दर्शकांच्या सहकार्यानेच झाली आहे. त्यामुळे औरंगाबादकरांनासुद्धा चित्रपटसृष्टीचा मोठा वारसा आहे. विशेष बाब म्हणजे या महोत्सवाला लाभलेले संचालक अशोक राणे यांनी आयुष्यातील चाळीस वर्षे अनेक फेस्टिव्हलचे निरीक्षण केले आहे. त्यामुळे त्यांच्या नजरेसमोर सलग चार दिवस चालणारा हा महोत्सव प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी असेल.

opening aurangabad film festival

मृणाल कुलकर्णी म्हणाल्या की, चार वर्षांपासून औरंगाबाद फिल्म फेस्टिव्हल हे ऑल इंडिया फिल्म फेडरेशनचा आधार घेत होते, मात्र यंदा स्वत: पुढाकार घेऊन महोत्सवाचे शिवधनुष्य पेलले ही अभिनंदनीय बाब आहे. तसेच या महोत्सवातून प्रेक्षकांना चित्रपट कसा पहावा याची दृष्टी तर येईलच. विशेष म्हणजे चित्रपट पाहण्याची आवड निर्माण होईल. कागलीवाल यांनी प्रास्ताविक केले. राणे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन निता पानसरे यांनी केले.

‘रुख’ ने महोत्सवाची सुरुवात

मनोज वाजपेयी अभिनित व अतनु मुखर्जी दिग्दर्शित ‘रुख’ या हिंदी चित्रपटाने फेस्टिव्हलची ओपनिंग करण्यात आली. यावेळी औरंगाबादकरांनी मोठा प्रतिसाद दिला. तसेच सलग चार दिवस महोत्सवात अनेक चित्रपटांची मांदीयाळी असणार आहे.