अंधेरीमधील इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

 मुंबई: अंधेरीमधील मरोळ परिसरातील मेमून मंझिल या ४ मजली इमारतीच्या चौथ्या मजल्याला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, या दुर्घटनेत ७ जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये १ पुरुष, १ महिला तर दोन मुलांचा समावेश आहे.

एसीमध्ये शाँर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे.मध्यरात्री दोनच्या सुमारास ही आग लागली. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीतून सात जणांची सुटका करण्यात आली आहे. दाऊद अली कपासी, तस्लीम अपासी कपासी, सकीना अपासी कपासी आणि मोहीन अपासी कपासी अशी मृतांची नावे आहेत. तर, कपासी कुटुंबियांच्या शेजारी राहणारे कोठारी कुटुंबीय जखमी आहेत. इब्राहिम कोठारी, सकीना कोठारी, हुसेन कोठारी, हजीफा कोठारी आणि झारा कटलरीवाला अशी जखमींची नावे आहेत.

या भीषण आगीमुळे कपासी कुटुंबाला घराबाहेर पडताच आले नाही. तेव्हा त्यांनी खिडकीमधून लोकांकडे मदत मागितली. पण कोणालाही त्यांना मदत करणे शक्य नव्हते. त्यामुळे घरातच त्यांचा होरपळून मृत्यू झाला. आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.