जगभरात थैमान घातलेल्या वायरसला ‘कोरोना’ हे नाव का देण्यात आले ?

टीम महाराष्ट्र देशा : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने आता भारतातही शिरकाव केला आहे. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला आहे. हा रुग्ण चीनमधील हुआन विद्यापीठात शिक्षण घेत असून, त्याची तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह आढळला. सध्या त्याला रग्णालयात डॉक्टरांच्या देखेरेखेखाली ठेवण्यात आलं असून प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.

चीनमधील हुबेई प्रांताची राजधानी- ‘हुआन’ हे ठिकाण कोरोना व्हायरसचे केंद्र मानले जात आहे. आतापर्यंत या व्हायरसने जगभरातील १७० जणांचा मृत्यू झाला आहे . या आकड्यात हुबेई प्रांतातील ३८ जणांचा समावेश आहे. दरम्यान, भारतीय सरकारने हुआन येथे असणाऱ्या २५० भारतीयांना मायदेशी आणण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांची सखोल तपासणी देखील करण्यात येणार आहे.

अशा पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून सर्वांची ‘सळो की पळो’ करून सोडणाऱ्या या वायरसला ‘कोरोना’ असे नाव का देण्यात आले ? पीआयबी इंडियाने ट्वीट करत याबद्दल अधिक माहिती दिली आहे.

कोरोना वायरस हे नाव लॅटिन भाषेतील शब्दावरून पडले आहे. लॅटिन भाषेत कोरोना म्हणजे किरीट (क्राऊन). कोरोना वायरसच्या पृष्ठभागावर मुकुटांसारख्या मालिका असतात. याला संदर्भ लावत या विषाणूला ‘कोरोनावायरस’ हे नाव देण्यात आले.

दरम्यान सुरुवातीला याला ‘2019 नोवेल कोरोना वायरस किंवा 2019-nCoV’ असे देखील नाव देण्यात आले होते. हा चीनमधील हुआन या ठिकाणी सापडलेला एकमेव पहिला वायरस असल्यामुळे, त्याला नोवेल असे नाव देण्यात आले होते.