महाराष्ट्र देशा ! मंगल देशा ! पवित्र देशा !

गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा शिवसेनेचा प्रयत्न ?

औरंगाबाद: भाजप पोलिसांवर दबाव आणून शहरातील शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यास भाग पाडत आहे, असा आरोप शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात शनिवारी औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. खोटी प्रकरणे उभी करून पोलीस शिवसैनिकांना त्रास देत आहेत. शिवसैनिकांना वारंवार तडीपार व इतर गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. या संदर्भात चंद्रकांत खैरे यांनी एका शिष्टमंडळासह पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी पोलीस आयुक्तांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, शहरात १५० जणांवर तडीपारीचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी फक्त तीन शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. हे तिघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. आमच्यावर एकाही प्रकरणात दबाव आलेला नाही. तरीही आपल्याला चुकीच्या पद्धतीनं कारवाई केली असं वाटत असेल तर विभागीय आयुक्तांकडे आपण तक्रार करू शकता. मला शिवसेना प्रिय आहे. शिवसैनिकांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन आयुक्तांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.

शिवसैनिकांवर राजकीय द्वेषातून काही असंतुष्ट व्यक्ती पोलिसांकडे खोट्या तक्रारी देत असल्याचे शिवसेनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पोलीस अशा खोट्या तक्रारींची चौकशी न करताच गुन्हे दाखल करीत आहेत. शिवसैनिक प्रत्येक वसाहतीमध्ये पोलीस प्रशासनाला नेहमीच सहकार्य करीत असतो. त्यामुळे त्या-त्या भागात शांतता-सुव्यवस्था राहण्यास मदतच होत असते. परंतु, कुणाच्या तरी दबावाला बळी पडून पोलीस प्रशासन शिवसैनिकांचे खच्चीकरण करत आहेत. पोलिसांकडून होणारा अन्याय गंभीर आहे. यापूर्वी प्रत्यक्ष भेटून शिवसैनिकांना न्याय मिळावा म्हणून विनंती केलेली होती. मात्र, त्याचा आपल्या पोलिस प्रशासनावर काहीच परिणाम झालेला दिसत नाही. अशीच परिस्थिती राहिल्यास पोलीस प्रशासनाविरुध्द शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण होईल. त्यामुळे आपण शिवसैनिकावरील खोटे गुन्हे, तक्रारी याची शहानिशा करुन पोलिसांकडून होणारा अन्याय त्वरीत थांबवावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. आठ दिवसांत हा प्रकार थांबला नाही तर आम्हाला नाईलाजाने पोलीस प्रशासनाविरुध्द शिवसेना स्टाईलने आंदोलन उभे करावे लागेल, असा इशाराही शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला आहे.

काय आहे प्रकरण ?

मागच्या सहा महिन्यांपासून एका 39 वर्षीय महिलेची छेड काढणाऱ्या आरोपीविरुद्ध गुरुवारी सिडको पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता, हा आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून शिवसेनेचा सिडको एन 8 भागातील नगरसेवक आहे गुरुवारी सायंकाळी पीडित महिला नित्यप्रमाणे योगा क्लासेस ला जात होती तेव्हा आरोपी मकरंद कुलकर्णी याने महिलेचा भर रस्त्यात हात पकडला तेव्हा त्या महिलेने पोलीस स्टेशन गाठले व घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला तेव्हा पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आरोपी मकरंद कुलकर्णी हा गेले सहा महिने पिडीत महिलेचा पाठलाग करत होता परंतु बदनामीच्या धास्तीने पीडित महिला शांत बसत असे गुरुवारी जेव्हा पीडितेचा मकरंद याने हात पकडला तेव्हा तिने त्याच्या हातून सुटण्याचा प्रयत्न केला तेव्हा तू काहीही केलंस तरी मी तुला सोडणार नाही अशी धमकी मकरंद याने पिडीत महिलेला दिली होती व पीडितेशी अश्लील वर्तन केले महिलेने आरडाओरड केली तर मकरंद कुलकर्णी ने तेथून दुचाकी वरून पळ काढला

You might also like
Comments
Loading...