राज्यातील भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांचे फोन टॅप केले जात असल्याचा आरोप

bjp

नागपूर : भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांचे फोन टॅप केले जात असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केलाय. त्यांच्या कार्यालयात एक पत्र आले असून त्यामध्ये राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांना भाजप नेत्यांच्या फोन टॅपिंगसाठी कामी लावल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याच पत्राच्या आधारावर आमदार खोपडे यांनी नागपूरात पोलीस तक्रार केली आहे.

कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम याचा फोन हॅक केल्याचा दावा करणाऱ्या हॅकरने आमदार कृष्णा खोपडे यांना पत्र पाठवून सावध केले आहे. हे पत्र त्याने टपालाने पाठवले आहे. तुमचे व तुमच्याशी संबंधित असलेल्यांच्या फोनचा सीडीआर, काढला जात आहे, संभाषण रेकॉर्डिंग केले जात आहे, असे या पत्रात नमुद असून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

खोपडे यांना शनिवारी हे पत्र त्यांच्या कार्यालयाच्या पत्त्यावर प्राप्त झाले आहे. खोपडे यांनी काल लकडगंज पोलिस ठाण्यात पत्र सादर करून तक्रार नोंदवली आहे. पत्र पाठवणायाने आपले नाव उघड करू नये, अशी विनंती केली असली तरी नावासह आपली स्वाक्षरीसुद्धा केली आहे. पत्र टाईप करण्यात आले आहे. स्वाक्षरी करणाऱ्याने मनीष भंगाळे असे नाव पत्राखाली लिहले असून आपली ओळख सायबर हॅकर, दाऊद इब्राहीम कासकर, रा. कराची, पाकिस्तान याचा सीडीआर काढणारा अशी दिली आहे.

सावधानतेचे निवेदन
पत्राच्या वर सावधानतेचे निवेदन असे शिर्षक देण्यात आले आहे. आपले, आपल्या कुटुंबीयाचे, मित्र मंडळी, आपले नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मोबाईल फोनचे विरोधक, शत्रु मार्फत सीडीआर काढले जात आहे. आपले मोबाईल ट्रॅकवर ठेवले असून त्यातील संभाषण रेकॉर्ड केले जात आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडील लँड लाईनचेही सीडीआर काढले जात आहे. विरोधकांनी या कामी पोलिसांची मदत घेतली आहे. ज्यांच्याकडे हे काम सोपविले आहे, ते पोलिस पैसे मिळतात म्हणून हे घृणास्पद कार्य करीत असल्याचेही पत्रात म्हटले आहे. मुंबई, पुणे, ठाणे या भागातील काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावेसुद्धा त्याने नमूद केली आहेत. संभाषण रेकॉर्ड होत आहे, याची अधिक माहिती हवी असेल तर एक मोबाईल नंबरसुद्धा त्याने दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“…अन्यथा आम्हाला झटका द्यावा लागेल”; राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला पत्रातून दिला इशारा

अरे देवा…. नागपूरकरांवर लटकतेय ‘इतक्या’ दिवसांच्या लॉकडाऊनची टांगती तलवार ?