भाजपच्या आमदाराने अजित पवारांच्या कानात सांगितले, बारामतीची जागा आम्हीच जिंकणार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि मुलगा पार्थ पवारचे प्रतिस्पर्धी श्रीरंग बारणे, मावळचे भाजप आमदार बाळा भेगडे एकाच मंचावर आलेले दिसून आले. विशेष म्हणजे यावेळी अजित पवार आणि बाळा भेगडे हे मुक्तसंवाद करताना दिसले. मात्र याचवेळी श्रीरंग बारणे हे शेजारी बसलेले असताना त्यांनी एकमेकांशी बोलणं तर दूर एकमेकांकडे पाहिलं देखील नाही.

आमदार बाळा भेगडे आणि अजित पवार या दोघांनी एकमेकांच्या कानात गुफ्तगू केल्याचे फोटो व्हायरल झाले आणि एकच चर्चा रंगली. यावर बाळा भेगडेंनी स्पष्टीकरण दिलंय. बारामतीची जागा आम्हीच जिंकू, असं अजित पवारांच्या कानात सांगितल्याचं ते म्हणाले. शिवाय मावळच्या जागेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

पुण्याच्या कान्हे फाटा येथील सामूहिक विवाह सोहळ्यात हा प्रसंग पाहायला मिळाला. मावळचे आमदार बाळा भेगडे हे भाजपचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष असून तब्बल दहा वर्षे ते आमदार आहेत. त्यांचे मावळमध्ये प्राबल्य असल्यामुळे या भेटीविषयी चर्चा होत आहे.