अहिल्यादेवी जयंती वाद : जानकर-शिंदेंवर जयंती हायजॅक केल्याचा आरोप

Ram-Shinde-

टीम महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे :- महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामधील मंत्री महादेव जानकर व अहमदनगरचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे हे जोपर्यंत मंत्रिमंडळात आहेत, तोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही, असा आरोप बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे यांनी जामखेड येथे पत्रकार परिषदेत केला आहे. पालकमंत्री ना.प्रा.राम शिंदे यांनी अहिल्यादेवी यांची चौंडी येथील होणारी जयंती हायजॅक केली असून बहुजन समाजाच्या वतीने आम्ही चौंडी येथेच पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती साजरी करणार आहोत. जामखेड पोलिसांनी चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करू नये, यासाठी बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे यांना १४९ ची नोटीस जारी केली आहे. आम्हाला तुरुंगात ज़ाण्याची वेळ आली तरी चालेल, पण आम्ही केलेला निर्धार आम्ही पूर्णच करणार आहोत असे डॉ. भिसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

डॉ.भिसे पुढे म्हणाले की, ३१ तारखेला तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्सव मोठ्या थाटात होत असून या कार्यक्रमास लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थितीत असणार आहेत. त्यासाठी पालकमंत्री राम शिंदे यांनी शासकीय यंत्रणा कामाला लावलेली आहे. याच पर्वभूमीवर धनगर समाजाचे सर्व नेते चौंडी येथे दुसऱ्या ठिकाणी बहुजन समाजाला एकत्रित घेऊन जयंती साजरी करणार आहेत. परंतु पोलीस प्रशासनाने मात्र त्यांना १४९ ची नोटीस बजावली आहे. आम्ही अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करून नये म्हणून आपल्याला नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील आम्ही १० हजार कार्यकर्त्यांना एकत्र करून चोंडी येथेच अहिल्यादेवी यांची जयंती साजरी करणारच आहोत, असे भिसे शेवटी म्हणाले.