अहमदनगर जिल्ह्यातील महसुली अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे वाळू तस्करांशी साटेलोटे ?

sand shortage, development stopped in solapur

अहमदनगर/प्रशांत झावरे :- अहमदनगर जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक महसुली अधिकाऱ्यांच्या संदिग्ध धोरणामुळे व एकमेकांत साटेलोटे असल्याने मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी फोफावली असून यामुळे जिल्ह्यातील सगळीच नदीपात्र व ओढे व अन्य वाळू उपसा ठिकाणे भकास होत चालली असून यामुळे पर्यावरणासाहित अन्य मोठी हानी होत आहे, तसेच परिसरातील ज्या रस्त्याने वाळूची वाहतूक होते त्या ठिकाणचे रस्ते, पुल खराब होवून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तरीही महसूल व पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प बसल्याचे दिसत असून यामध्ये नागरिकांचा काही ठिकाणी नाहक बळी गेला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात गेल्या दोन वर्षांपूर्वी तत्कालीन प्रांताधिकारी प्रशांत खेडेकर यांनी वाळू तस्करीविरुद्ध धडाकेबाज मोहीम उघडून वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या होत्या त्यामुळे तालुक्यातील वाळू तस्करी काही काळ थांबली होती.चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू वाहनांवर प्रांताधिकारी प्रशांत खेडेकर यांनी मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई करून मोठा महसूल शासकीय तिजोरीत जमा केला होता परंतु प्रांताधिकारी प्रशांत खेडेकर यांची बदली झाल्यानंतर सद्याचे प्रांतअधिकारी विक्रम बांदल यांच्या कार्यकालात ही मोहीम पूर्णपणे थंडावली असून तहसील कार्यालय तसेच प्रांताधिकारी कार्यालया समोरून दिवसाढवळ्या वाळूच्या ट्रक, ट्रॅक्टर, टिपर अश्या वाहनातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक होत आहे.

पाथर्डी शहरासह तालुक्यात व जिल्ह्यातील ठिकठिकाणी बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी मुंगी, पैठण तसेच गेवराई तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर वाळू आणली जाते. याकडे तालुक्यातील महसुली अधिकाऱ्यांचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्यामुळे वाळू वाहतूक करणारे वाळू तस्कर यांच्यावर कुणाचाही अंकुश राहिलेला नसून परिसरात अल्पावधित मोठा पैसा मिळत असल्याने त्यातून गुन्हेगारी बाळसे धरु लागली आहे. पाथर्डी तहसील कार्यालय तसेच प्रांताधिकारी कार्यालय यांच्यासमोर असलेले शासकीय जागेवरील हॉटेलमध्ये बसून वाळू तस्कर तहसीलदार, प्रांतअधिकारी यांच्यावर नजर ठेवतात प्रांताधिकारी किंवा तहसीलदार कार्यालयाचे बाहेर पडल्यानंतर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाला थेट मोबाइलवरून खबर केली जाते, याबाबत महसुली अधिकाऱ्यांना कल्पना असून देखील संबधिता विरुद्ध कारवाई करण्यास महसुली अधिकारी धजावत नाहीत, त्यामुळे वाळू वाहतूकदारांचे चांगलेच फावले आहे.

तहसील कार्यालयातील काही कर्मचारी वाळू वाहतूकदारांना गोपनीय माहिती देत असल्याची माहिती गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांवरून समोर येत आहे. तहसील कार्यालयासमोरील शासकीय जागेवर तहसील कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी अवैधरित्या अतिक्रमण करून टपऱ्या उभरल्या आहेत याच ठिकाणाहुन तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक प्रांताधिकारी यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली जाते. तालुक्यातील पागोरी पिंपळगाव, खेर्डे व सुजळगाव, कोरडगाव या ठिकाणच्या नदीपात्रातून रात्री तसेच भरदिवसा खेडे व दुलेचांदगाव मार्गे मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक केली जाते. वाळू वाहतूक करताना पाथर्डी शहरातील मारुती मंदिराजवळ वाळू वाहतूकदार त्यांचा खबऱ्या उभा असतो. महसुली अधिकार्यांचे वाहन सदरील रस्त्याने गेल्यास वाळू वाहतूक करणार्या वाहनास खबर केली जाते, त्यामुळे वाळू वाहतूकदार वेळी सावध होवून कारवाईपासून स्वतचा बचाव करतात. कोरडगाव वसु जळगाव तसेच पागोरी पिंपळगाव या ठिकाणच्या नदीपात्रातून चोरट्या मार्गाने माळेगाव, दुलेचांदगांव, पाथर्डी या रस्त्याने मोठ्या प्रमाणावर रात्री व दिवसा ट्रॅक्टरने डंपरने वाळू वाहतूक केली जाते, वाळू वाहतूक करणारी वाहने रस्त्याने भरधाव जात असल्याने यापूर्वी अनेक वेळा छोटे मोठे अपघात घडले आहेत.

रस्त्याने जात असताना वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची इतर वाहनांवर दादागिरी असते तसेच वाळूचे वजन जास्त असल्याने अवजड वाहतुकीमुळे दुलेचांदगाव ते पाथर्डी या दरम्यान असलेल्या तीन पुलांना मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्या असून वाळू वाहतूकी मुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी तहसीलदार नामदेव पाटील तसेच नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना वेळोवेळी सदर बाबीची कल्पना देऊनही काहीच कार्यवाही होत नसल्याने परिसरातील ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाच्या विरुद्ध आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. तालुक्यातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाची होणारी चोरी व त्याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याची प्रशासकीय जबाबदारी असलेले प्रांताधिकारी विक्रम बांदल यांच्या मवाळ धोरणामुळे तालुक्यातील नदीपात्र ओसाड बनत चालली असून पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहेत.