विधानसभेच्या रिंगणात आप ही उतरणार, उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर

aap logo

टीम महाराष्ट्र देशा:- विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष चांगलेच तयारीला लागले आहेत.याच पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षानं देखील यंदा विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत आपच्या नेत्या प्रीती मेनन यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एवढंच नाही, तर आपने आपली उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर केली आहे. राज्यभरात ५० ते ५५ जागांवर आप निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.

या पत्रकार परिषदेत बोलताना प्रीती मेनन म्हणाल्या की, महाराष्ट्रात आमच्याकडे ६०० ते ७०० अर्ज आले होते. पण अंदाजे ५० जागा लढवण्याचा आपचा विचार आहे. ही लढाई आम लोकांची आहे. इथले सर्व पक्ष एकच आहेत. त्यामुळेच त्यांच्याविरोधात आम्ही लढत आहोत,असे त्या यावेळी म्हणाल्या.

तसेच वंचित बहुजन आघाडीसोबत आमची एकत्र येण्यासंदर्भात बोलणी सुरू आहेत’, असे ही त्या म्हणाल्या. वंचितसोबत गेल्यास कोणत्या जागा कुठे सोडायच्या यावर चर्चा सुरू आहे. वंचित सोबत यायला तयार असेल, तर आम्ही तयार आहोत. वंचितचे लोकसभेचे उमेदवार चळवळीचे होते. त्यामुळे जर चांगले लोक राजकारणात येत असतील, तर त्यांच्यासोबत जायला काही हरकत नाही’, असं देखील त्यांनी यावेळी  नमूद केलं.

आपल्या पहिल्या यादीत आठ उमेदवार

१) विदर्भातील ब्रम्हपुरी – अॅड. पारोमित गोस्वामी

२) जोगेश्वरी पूर्व – विठ्ठल गोविंद लाड

३) कोल्हापूर करवीर – आनंद गुरव

४) नांदगाव (नाशिक) – विशाल वडघुले

५) कोथरूड – डॉ. अभिजित मोरे

६) चांदीवली – सिराज खान

७) दिंडोशी – दिलीप तावडे

८) पर्वती पुणे – संदीप सोनवणे