मंगळवारी दिवसभरात केव्हाही करा गौरी आवाहन

सोलापूर : यंदा २९ ऑगस्ट रोजी अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन करावयाचे आहे. संपूर्ण दिवसभरात केव्हाही गौरी आवाहन करता येणार आहे, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले आहे.

गौरी आवाहनासाठी बाजारपेठही सज्ज झाली आहे. गौरींचे मुखवटे, कलश, साड्या, स्टँड, हात, सजावट साहित्य आदींची बाजारपेठेत रेलचेल आहे. पारंपरिक उभ्या प्रकारातील गौरींचे लोखंडी स्टँड विक्रीस आलेली असून, मधला मारुती, टिळक चाैक, आसरा चौक, जुळे सोलापूर, विजापूर रोड आदी भागात यांची विक्री होत आहे. या दोन स्टँडच्या किमती ५०० रुपयांपासून आहेत. तसेच सजावटीसाठी मंडपाचे ही विविध साहित्य विक्रीस आलेले आहे.

कापडी लोखंडी अँगल अडकवायचे मंडप यांना मागणी आहे. यांच्या किमतीही आकारानुसार दर्जा पाहून आहेत. सजावटीसाठी असली फुलासारखी दिसणारी प्लास्टिकच्या फुलांची कुंडी, वेल झाडीही विक्रीस आलेली आहेत. तसेच विविध प्राणी, पक्षी मूर्तीही आहेत. साड्यांनाभरपूर मागणी काहीघरांमध्ये कलशावरच्या लक्ष्मी गौरींची स्थापना करण्यात येते. त्याच्या सजावटीसाठी आकर्षक असे सोन्यासारखे दिसणारे मंगळसूत्र, ठुशी, बोरमाळ, नेकलेस आदींचे विविध नमुने विक्रीस आलेले आहेत. यांच्या किमती अगदी २० रुपयांपासून आहेत. तर कलशावरच्या गौरींसाठी आणि उभ्या गौरींसाठी विविध प्रकारच्या रेडीमेड साड्याही उपलब्ध आहेत. नऊवारी, जरीबुट्टी, मोरपंखी, रेशमी, इरकली असे याचे प्रकार असल्याचे विक्रेते नागेश पाटील यांनी सांगितले.

अवघ्या १५० रुपयांपासून याच्या किमती असून, मुखवट्यासह संपूर्ण अलंकारासह असणारा सट ४०० ते ५०० रुपयांना रेडिमेड स्वरुपात बाजारात उपलब्ध आहे. बुधवारी गौरी विसर्जन ज्येष्ठानक्षत्रावर गौरी पूजन भोजन असून, ३० ऑगस्ट रोजी बुधवारी गौरी पूजन नेहमीप्रमाणे करावे. तसेच गुरुवारी ३१ ऑगस्टला मूळ नक्षत्रावर विसर्जन असल्याने बुधवारी दिवसभरात केव्हाही गौरींचे उत्तर पूजन करून गौरी विसर्जन करता येईल. तसेच परंपरेप्रमाणे गौरीचे दोरे घेता येतील.