बेळगावच्या नवनिर्वाचित नगरसेवक रवी साळुंखे राज ठाकरेंची घेतली भेट

मुंबई : बेळगाव महापालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवक रवी साळुंखे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी रवी साळुंखे यांचे बेळगाव महापालिका निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन केले असल्याची माहिती आता समोर आली आहे. सोमवारी सकाळी रवी साळुंखे यांनी मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी रवी साळुंखे यांच्यासोबत एक शिष्टमंडळ सुद्धा उपस्थित होते. या भेटीदरम्यान, राज ठाकरे यांच्याकडून रवी साळुंखे यांचा सन्मान करण्यात आल्याची माहिती ट्विटरवरुन मिळाली आहे.

रवी साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काल मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष कार्यालयात जाऊन अविनाश जाधव यांचीही भेट घेतली होती. यावेळी अविनाश जाधव यांनी रवी साळुंखे यांचा सत्कार केला. यावेळी प्रतीक गुरव, आनंद टपाले, दशरथ नांगरे, सुमंथ जाधव, अप्पाजी बस्तवाडकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

रविवारी नगरसेवक रवी साळुंखे यांनी शिवसेनेचे नेते आणि बेळगाव सीमा समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली होती. यावेळी पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मराठी भाषिक आमदार निवडून यावेत, यासाठी एकनाथ शिंदे यांनी बेळगावसाठी रणनीती ठरवावी आणि यासाठी त्यांनी बेळगावात यावे, अशी विनंती रवी साळुंखे यांनी केली.

महत्वाच्या बातम्या :