प्राप्तिकर रद्द करा – सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली मध्यमवर्गाचा आर्थिक विकास साधण्यासाठी प्राप्तिकर रद्द करण्याची गरज आहे, असे मत भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले आहे. प्राप्तिकर म्हणजे ओझं असल्याचंही ते यावेळी म्हणाले. हैदाराबादमध्ये इंडियन एक्झिबिशन इंडस्ट्री आयोजित आठव्या आयईआयएच्या सेमिनारमध्ये सुब्रमण्यम स्वामी बोलत होते.

मध्यमवर्गीय आणि नव्या पिढीतील उद्योजकांसाठी प्राप्तिकर अडथळ्याचं ठरत असून, प्राप्तिकर म्हणजे त्यांचा ‘छळ’ आहे, असेही स्वामी म्हणाले.“भारतात प्राप्तिकर कोण भरतं? अगदी मोजक्या संख्येतील लोक भरतात. मग तुम्ही या मोजक्या संख्येतील लोकांवर प्राप्तिकराचं ओझं का टाकत आहात?” असे स्वामी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

प्राप्तिकर रद्द झाल्यास बचतीत मोठी वाढ होईल आणि परिणामी गुंतवणुकीतही वाढ होईल, असे स्वामी म्हणाले.“प्राप्तिकर रद्द केल्यास बचत वाढेल, बचत वाढल्याने गुंतवणूक वाढेल आणि गुंतवणूक वाढल्याने विकासदर वाढेल. त्यामुळे प्राप्तिकर रद्द केल्याने जे नुकसान होईल, त्यापेक्षा अधिक पटीने अप्रत्यक्ष करातून मिळेल.”, असे गणित सुब्रमण्यम स्वामी यांनी मांडले आहे.

प्राप्तिकर रद्द केल्यास महसुलावर परिणाम होऊ नये, यासाठी सुब्रमण्यम यांनी कोळसा खाणींच्या लिलावाचा पर्याय सूचवला आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणजेच कोळसा खाणी किंवा स्पेक्ट्रम यांचे लिलाव करावेत, असे स्वामी म्हणाले.बेरोजगारी आणि दारिद्र्याशी सामना करण्यासाठी देशाने विकासात येत्या वर्षात 10 टक्क्यांनी वाढले पाहिजे, असे मत स्वामी यांनी यावेळी  मांडले.